• Tue. Feb 4th, 2025

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

नॅनो खतांसह सर्व खरेदी नियमानुसारच, आरोप धादांत खोटे!

ByXtralarge News

Feb 4, 2025
Visits: 2 Today: 2 Total: 4031005

नॅनो खतांसह सर्व खरेदी नियमानुसारच, आरोप धादांत खोटे!

मुंबई, दि. ०४ फेब्रुवारी :-

मार्च २०२४ दरम्यान कृषी विभागाने खरेदी केलेल्या नॅनो खते, इलेक्ट्रिक फवारणी पंप, कापूस साठवणुकीच्या बॅग इत्यादी जी खरेदी करण्यात आली ती संपूर्णपणे शासनाचे संकेत अनुसरूनच करण्यात आले. डी बी टी वरील वितरणात सदर वस्तू वगळून त्या शासन मार्फत खरेदी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच केलेली आहे. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले संपूर्ण आरोप हे धादांत खोटे असून केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी केले आहेत असे मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

मागील 59 दिवसांपासून आमची मीडिया ट्रायल केली जात असून वेगवेगळे चुकीचे व खोटे आरोप करून केवळ आणि केवळ आमची बदनामी केली जात आहे असे म्हणतानाच धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवरती सविस्तर स्पष्टीकरण देत सर्व आरोप खोडून काढले.

मुळात देशाचे पंतप्रधान स्वतः नरेंद्र मोदी साहेब यांनी नॅनो खतांच्या वापरावर भर देण्याबाबत सूचना केलेले आहेत त्याचे पालन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून नॅनो खतांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पन्नात भर पडते म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नॅनो खते वापरावीत असा माझा भर होता.

नॅनो युरिया व नॅनो डीएपी ही दोन्ही शासनाने खरेदी केलेली खते इफको या कंपनीने बनवलेले असून त्या कंपनीचे दर कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतात सर्वत्र सारखेच आहेत त्यामुळे या दरांमध्ये तफावत होती आणि त्यातून अमुक कोटींचा घोटाळा झाला असे बोलणे म्हणजे अज्ञानाचे लक्षण आहे असे धनंजय मुंडे म्हणाले.

त्याचप्रमाणे बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप खरेदी करताना काही कंपन्या काही राज्यांमध्ये जे फवारणी पंप पुरवतात त्यांना सहा महिन्यांची वॉरंटी व त्या आतील दुरुस्ती देतात मात्र महाराष्ट्र शासनाने फवारणी पंप खरेदी करताना किमान एक वर्ष वॉरंटी दिली जावी व त्यातील दुरुस्तीचा खर्च संबंधित कंपनीने करावा अशा प्रकारचे फवारणी पंप संपूर्ण निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक रीतीने राबवूनच खरेदी केले असून संबंधित चारही प्रकारच्या निविदा प्रक्रियेत जास्तीत जास्त कंपन्यांनी सहभागी व्हावे यासाठी संबंधित निविदाना दोन वेळा मुदत वाढ सुद्धा देण्यात आली होती असेही मुंडेंनी स्पष्ट केले.

ज्या काळात हे सर्व घडले त्या काळामध्ये कापसाचे भाव पडलेले होते त्यामुळे सहसा शेतकरी कापूस विकायला तयार होत नव्हते मात्र घरामध्ये पडून राहिल्याने कापसाबरोबरच शेतकरी कुटुंबांना सुद्धा विविध संसर्गजन्य आजाराची लागण होऊ लागल्याने कापूस भरून ठेवण्यासाठी बॅगा देण्याची मागणी समोर आली तेव्हा भारत सरकारच्या कंपनीकडून प्रमाणित असलेल्या दरानेच केंद्र सरकारच्या कंपनीकडूनच संबंधित खरेदी करण्यात आल्याचे मुंडेंनी स्पष्ट केले आहे.

मान्सून च्या सुरू होण्याच्या अगोदर पेरणी आणि पेरणी उत्तर कामाची तयारी शेतकऱ्यांना करून ठेवावी लागते. मधल्या काळात लोकसभेची आचारसंहिता लागणार होती त्यामुळे सदर प्रक्रिया ही मार्च महिन्यातच राबवण्यात आली. संपूर्ण कल्पना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांना होती व संपूर्ण प्रक्रिया ही त्यांच्या पूर्वपरवानगीनेच पार पडलेली आहे. मात्र शेतीच्या मशागतीतील आणि शेतकऱ्यांची संबंधित कोणत्या गोष्टी कधी केल्या जाव्यात तसेच काय केले पाहिजे याचे कदाचित अंजली दमानिया यांना माहिती नसावी असेही धनंजय मुंडे म्हणाले.

अंजली दमानिया यांनी आजवर वेगवेगळ्या नेत्यांवर अनेक आरोप केले, परंतु त्यात पुढे काय झाले, याचा शोध माध्यमांनी घ्यावा, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

प्रत्येक प्रकरणांमध्ये अंजली दमानिया ह्या केवळ न्यूज व्हॅल्यू मिळवण्यासाठी आणि विशिष्ट हेतू साध्य करून घेण्यासाठी काहीही खोटे आरोप करून सनसनाटी निर्माण करतात आणि कॅमेऱ्यासमोर येतात. बीडच्या प्रकरणात सुद्धा जेव्हा त्यांनी एन्ट्री घेतली तेव्हा त्यांनी तीन आरोपींची नाव घेत या आरोपींची हत्या झाली आहे अशी बतावणी करत सणसणाटी निर्माण केली होती. त्यांनी अशा पद्धतीच्या खोट्या आणि तपासाची दिशाभूल करणाऱ्या गोष्टी का पसरवल्या याबाबत आजही कोणी त्यांना एक शब्द विचारायला तयार नाही, याबाबत धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.

 

अंजली दमानिया यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट च्या नावाखाली केलेले आरोप देखील पूर्णपणे चुकीचे आणि खोटे असून माझ्याशी संबंधित असलेली व्यंकटेश्वरा ही कंपनी थर्मल पावर स्टेशन अर्थात महाजनको कडून एक रुपये ही कमवत नाही हे रेकॉर्डवर आहे. कंपनीच्या बॅलन्स शीट व बँक अकाउंट स्टेटमेंट वरती सुद्धा आहे. हे अंजली दमानीयांना सुद्धा माहित आहे. थर्मल मध्ये कोळशामुळे तयार झालेली राख ही तळ भरून साठवू न देता ती घेऊन जावी व इतर उद्योगांना वापरावी अशी सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्वे आहेत. थर्मल पावर स्टेशनच्या राखेमुळे आमच्या भागात सिमेंट कंपनी आली, रोजगार मिळाले. सिमेंट कंपनीला कोणी राख पुरवली आणि होणारे प्रदूषण कमी केले तर त्यात ऑफिस ऑफ प्रॉफिट कसले आले? माझ्या किंवा माझ्या पत्नीच्या कंपनीने महाजनको कडून एकही रुपया कमावला नाही. मात्र तरीही मागील 59 दिवसांपासून सातत्याने खोटे आरोप करून आमची मीडिया ट्रायल केली जात आहे. त्याद्वारे माझ्यासह बीड जिल्ह्याची आणि बहुजन समाजाची सुद्धा बदनामी केली जात आहे असे म्हणत धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांचा अंजली बदनामीया असा उल्लेख करत खोचक टोला लगावला.

 

रोज एका नवीन प्रकरणाचा आधार घेऊन खोटे आणि धादांत चुकीचे आरोप करून मीडिया ट्रायल करून आमची बदनामी करण्याचे काम कोणीतरी अंजली बदनामिया यांना दिले असून हे काम करण्यासाठी त्यांना तसेच ज्यांनी काम दिले आहे त्यांना सुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत, असे म्हणायलाही धनंजय मुंडे विसरले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *