BMC चा अर्थसंकल्प मुंबईकरांचे जीवन सुसह्य करणारा!
मुंबई, दि ४ फेब्रुवारी २०२५ ;
देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका म्हणून ख्याती असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा ७४ हजार ४२७.४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या अर्थसंकल्पात तब्बल १४. १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वच स्तरातून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात येत आहे. भाजपा विधान परिषद गटनेते प्रविण दरेकर यांनीही या अर्थसंकल्पाचे स्वागत करत मुंबईकरांचे दैनंदिन जीवन सुकर करण्यासाठी महापालिकेचा सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प असल्याचे प्रतिपादन केले.
आ. दरेकर यांनी म्हटले आहे कि, मुंबईकरांचे दैनंदिन जीवन सुकर करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करणारा मुंबई महानगरपालिकेचा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. एकूण ७४ हजार ४२७ कोटीचा हा अर्थसंकल्प ६० कोटी ६५ लाख रुपये शिलकी अर्थसंकल्प आहे. महायुती सरकारने पायाभूत विकासावर भर देण्याचे उद्दीष्ट महापालिकेसमोर ठेवल्यामुळे भांडवली खर्च २५ ते ३५ टक्क्यांवरुन ५० टक्क्यांवर आणि महसुली खर्च ७५ टक्क्यांवरुन ४२ टक्क्यांवर आला, याला खूप महत्व आहे. मालमत्ता करात कोणतीही वाढ नाही, हा मुंबईकरांना मिळालेला मोठा दिलासा असल्याचेही दरेकर यांनी म्हटले आहे.
तसेच कोस्टल रोड, जीमएलआर, एसटीपी, खड्डेमुक्त मुंबईसाठी कॉक्रीट रस्ते, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, किनारी रस्ता उत्तर प्रकल्प, महत्वाचे पूल, रेल्वेचे पूल, यासाठी मोठ्या तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. आरोग्य सेवा, शिक्षण, वायू प्रदूषण रोखण्यासाठी, घनकचरा व्यवस्थापन, पर्जन्य जलवाहिन्यांसाठीही चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत. १ हजार कोटी रुपयांची केलेली तरतूद बेस्ट उपक्रमाला अडचणीच्या काळात महत्वाची ठरणार आहे. कोळीवाड्यांच्या विकासासाठी ४० कोटी रुपये आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, महिला, युवा, झोपडपट्टीतील रहिवासी यांच्यासाठी केलेल्या तरतुदीतही अर्थसंकल्पात वाढ केल्याचे दिसत आहे. एकूणच मुंबईचा जलद विकास आणि मुंबईकरांचे दैनंदिन जीवन सुसह्य करणारा हा अर्थसंकल्प आहे, मी त्याचे स्वागत करतो, असेही दरेकरांनी म्हटले आहे.