कोरोनाच्या नविन व्हेरिएंटला घाबरण्याचे कारण नाही..
नागपुर, दि. २१ डिसेंबर;
कोरोनाच्या नविन व्हेरिएंटचा राज्यात अद्याप एकही रूग्ण सापडलेला नसून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विमानतळावर तपासणी आणि तपासणीत काही आढळून आल्यास तात्काळ विलगीकरण करण्याच्या सुचना दिल्या असल्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
चीनसह इतर काही देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढला असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपल्या राज्यात कोरोना चाचणी, उपचार, लसीकरण तसेच कोरोना रूग्णांचा तपास हे पुन्हा एकदा सुरू करण्याच्या सुचना आरोग्य विभागास दिल्या असल्याचे मंत्री सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगून राज्यात BF.7 ह्या नविन व्हेरिएंटचा अद्यापही एकही रूग्ण आढळून आला नाही मात्र शेजारील राज्यात चार रुग्ण सापडले आहेत, त्यामुळेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विमानतळ, राज्याच्या सीमारेषा, या भागातून येणा-या व्यक्तींची थर्मल टेस्टींग तसेच इतर अत्यावश्यक चाचणी करून घेण्यात येणार आहेत, त्या चाचणीत काही आढळून आले तर लगेचच विलगीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाचे निर्बंध अद्याप कोठेही लावण्यात येणार नसून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील आवश्यक ते निर्णय घेण्यात येणार असल्याचे सावंत यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. त्याचबरोबर आज राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा संपूर्ण आढावा घेतला असून यंत्रणेस अलर्ट मोडवर राहाण्याच्या सुचना दिल्या असल्याचे या प्रसंगी त्यांनी सांगितले. राज्यात मोठ्याप्रमाणावर लसीकरण झाले असून नविन व्हेरिएंट हा तेवढा घातक नाही असे सांगितले.