महिलांची बोली लावणारे ‘बुल्लीबाई’ आहे तरी काय ?
मुंबई, दि. ५ जानेवारी:
सोशल मीडियामुळे माहितीचा वेग प्रचंड वाढला असला तरी त्याचा गैरवापरही चितेंची बाब ठरत आहे. अशाच एक गंभीर प्रकरण सध्या चर्चेत आहे ते म्हणजे बुल्लीबाई अॅप…
बुल्लीबाई अॅप हे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. याआधी सुल्लीडील्सही असेच चर्चेत होते. सुल्लीडील्सवर मुस्लिम महिलांची बोली लावली जायची. ते अॅप ब्लॉक केल्यानंतर बुल्लीबाई नावाने दुसरे अॅप बनवले गेले.
सोशल मीडियात सक्रिय असलेल्या १०० महिलांना टार्गेट करून त्यांचे आक्षेपार्ह फोटो या अॅपवर अपलोड करायचे व त्यावर किंमत टाकून त्यांची बोली लावली जायची. दिल्लीतील एका महिला पत्रकाराचाही त्यात मॉर्फ केलेला आक्षेपार्ह फोटो पोस्ट करण्यात आला होता.
बुल्लीबाई हे अॅप गिटहब या प्लॅटफॉर्मवर लॉन्च करण्यात आले होते. सोशल मीडियात अॅक्टिव्ह असलेल्या महिलांवर बोली लावण्याचा प्रकार या अॅपवर चालत होता. अॅप ओपन करताच स्कीनवर मुस्लिम महिलांचे फोटो यायचे आणि त्यावर नावासह किंमतही असायची. बुल्लीबाई या नावाने असलेल्या ट्वीटर हँडलवरही त्याचे प्रमोशन केले जात होते.
बुल्लीबाई अॅपद्वारे मुस्लीम महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि त्यांची बोली लावली जात असल्याचा प्रकाराने देशभरात संताप व्यक्त केला जात होता. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी याविरोधात आवाजही उठवला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने धडक कारवाई केली आणि तिघांनी अटक केली. यात एक इंजिनीअर व या प्रकरणाची मुख्य सूत्रधार असलेल्या महिलेलाचा समावेश आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची सुत्रधार १८ वर्षाची श्वेतासिंह आहे. तर तीला साथ देणारे दोघे तरुणच आहेत. या प्रकरणातील विशालसिंग या तिसऱ्या आरोपीने ३१ डिसेंबरला अकाऊंटचे नाव बदलून खालसा सुप्रिमिस्ट असे ठेवून संशय शीख समुदायातील व्यक्तीवर जावा असा प्रयत्न केला.
ज्या मुस्लीम महिला आपली मतं ठामपणे मांडतात अशा महिलांनाना लक्ष्य करण्यात आले होते. सोशल मीडियावरून महिलांचे फोटो घेऊन त्याचा असा विकृतपणे वापर करणे हा महिलांचा ऑनलाईन छळ सुरु होता. मुंबई पोलिसांच्या धाडसी कारवाईने त्याला ब्रेक मिळाला असला तरी अशा विकृत लोकांना कायमची अद्दल घडवली पाहिजे.