बापरे, ५ हजार ५०० कोटींची पोटगी !!
लंडन, दि. २२ डिसेंबर:
घटास्फोटानंतर विभक्त पत्नीला कायद्याने पोटगी द्यावी लागते, तशी हजारो प्रकरणे आपण पाहिली आहेत. पण ही पोटगी किती असू शकते ? आपण आजपर्यंत १० कोटी, १०० कोटी रुपयांच्या पोटगीच्या बातम्या ऐकल्या आहेत परंतु आजपर्यंतची सर्वात महागडी पोटगी ही तब्बल ५ हजार ५०० कोटी रुपयांची आहे.
तसे हा घटस्फोट व पोटगीचे प्रकरण साध्या कुटुंबातील नाहीच. ते एका राजघराण्यातील आहे. तर मंडळी प्रकरण असे आहे की, जॉर्डनच्या राजकुमारी आणि संयुक्त अरब अमिरातचे पंतप्रधान तथा दुबईचे राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांच्या सहाव्या पत्नी हया बिंत अल हुसैन यांचे हे प्रकरण आहे. दुबईच्या राजाला हया यांनी पूर्वसूचना न देता शरिया कायद्यानुसार फेब्रुवारी २०१९ मध्ये घटस्फोट दिला. हया या दुबईचे राजा रशीद अल मक्तुम यांची सहावी आणि सर्वात कमी वयाची पत्नी आहे. हया यांचे बॉडीगार्ड सोबतचे प्रेमप्रकरण उघड झाल्यानंतर राजकुमारी हया यांनी दुबईसोडून ब्रिटन गाठले. हया यांनी आपले बॉडीगार्डबरोबरचे संबंध कळू नये म्हणून राजकुमारी हया यांनी १२ कोटी रुपये खर्च केले. हया आपल्या या बॉडीगार्डला महागड्या वस्तू भेट म्हणून देत असत. हया या ४६ वर्षांच्या तर बॉडीगार्ड ३७ वर्षांचे असताना संबंध आले व त्यांचे नाते दोन वर्ष टिकले.
मुलांचा ताबा मिळावा यासाठी त्यांनी ब्रिटनमधील न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. त्यावर निकाल देताना न्यायालयाने दुबईच्या राजाला ५ हजार ५०० कोटी रुपये पत्नीला देण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाने शेख यांना दिलेल्या निर्देशानुसार २५१ मिलियन पाउंडची रक्कम पुढील तीन महिन्यांमध्ये हया बिंत अल हुसैन यांना द्यावी लागणार आहे. ब्रिटनमधील कोणत्याही कौटुंबिक केसमधील ही सर्वात मोठी नुकसान भरपाईची रक्कम आहे. एवढी मोठी रक्कम पोटगी म्हणून द्यावी लागणार असली तरी ही रक्कम हया बिंत अल हुसैन यांनी मागणी केलेल्या रक्कमेपेक्षा फार कमी आहे. हया यांनी १.४ बिलियन पाउंडची मागणी केली होती.
असो मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी…