महाराष्ट्रातील पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा.
नवी दिल्ली दि.4 फेब्रुवारी ;
महाराष्ट्रात झालेल्या कोट्यावधी रुपयाचे पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केली. सुप्रिया सुळेंच्या मागणीवर केंद्रीय कृषिमंत्री यांनी सभागृहात सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान कृषी मंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींच्या घोटाळ्याची कबुली राज्याला दिली. यावर सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी हा घोटाळा पाचशेऐवजी पाच हजार कोटींचा असल्याचा खळबळजनक खुलासा केला. ही गांभीर्यपूर्ण घटना सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडली आहे
महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री म्हणून आपणास याबद्दल माहित होते का? आणि या घोटाळ्याचे चाैकशीचे आदेश आपण देणार का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनीधींनी अशा घोटाळ्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांना अवगत केली का? तसेच या घोटाळ्याची चौकशी व्हावी यावर मंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती त्यांनी केली. त्यावर या कोट्यावधींच्या घोटाळ्याची गांभीर्यपूर्ण दखल घेत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी या घटनेची सखोल चौकशी करुन यात गडबड असल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.