कपाट उघडले आणि घबाड निघाले…१५० कोटींचे !
लखनौ, दि. २४ डिसेंबर
एका अत्तर व्यापाऱ्याच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकली आणि घरातील कपाट उघडताच अधिकारीही अवाकच झाले… भरगच्च भरलेल्या कपाटात नोटांचे बंडल कोंबून भरलेले दिसले. जवळपास ९० कोटी रुपयांची रोकड मोजण्यात आल असून सर्व मालमत्ता तब्बल १५० कोटी रुपयांची असल्याचे समजते.
कानपूरमधील पियूष जैन या व्यापाऱ्याच्या मालमत्तांवर ही रेड टाकण्यात आली. या नोटाच एवढ्या होत्या की अधिकाऱ्यांना या नोटा मोजण्यासाठी चार मशीन मागवाव्या लागल्या. २४ तास नोटा मोजण्याचे काम सुरु होते तरीही ते काही संपत नव्हते. नोटा मोजून अधिकारीच थकले.
जैन हे एका पान मसाला उद्योगाचे संस्थापक आहेत. तसेच परफ्यूमचाही व्यवसाय आहे. आयकर विभागाने जैन यांचे कन्नौज येथील घर, कार्यालय, पेट्रोल पंप आणि कोल्ड स्टोरेजवर एकाचवेळी रेड टाकली तसेच मुंबईतही छापे टाकले. करचोरी केल्याप्रकरणी जीएसटीकडून ही कारवाई करण्यात आली त्यानंतर आयकर विभागही कारवाईत सहभागी झाले. बनावट कंपन्यांच्या नावाने बिले तयार करून जीएसटी बुडवला होता, असे समजते.