• Sat. Feb 8th, 2025

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 104 Today: 4 Total: 4040335

मारकडवाडीच्या आंदोलनात शरद पवार…

सोलापूर, दि. ८ डिसेंबर ;
अमेरिकेमध्ये मत मतपेटीत टाकले जाते, जगातला लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंडमध्येही मत मतपेटीमध्ये टाकले जाते. युरोप खंडातले सर्व देशही EVM वर निवडणुका घेत नाहीत. अमेरिकेने आणि काही देशांनी एकेकाळी EVM चा विचार केला पण त्या सगळ्या देशांनी EVM नको अशी भूमिका घेतली आणि काय लोकांना मतपेटीत मत टाकण्याचा अधिकार दिला अख्खे जग बॅलेट पेपरवर मतदान घेत असताना भारतात का नाही? अशी शंका निर्माण झाली. त्या शंकेमुळे लोक अस्वस्थ आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावात EVM  हटाओ, संविधान और देश बचाओ या आंदोलनात शरद पवार यांनी मारकड वाडीच्या ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील पाटील, विद्या चव्हाण व आमदार उत्तमराव जानकर आदी उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की,एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सबंध देशामध्ये ज्याची चर्चा चालू आहे त्या प्रश्नासाठी आज आपण या ठिकाणी आलो आहोत. मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो की, या महत्त्वाच्या प्रश्नासाठी सबंध देशाला तुम्ही जागं केलं. लोकसभेमध्ये धैर्यशील मोहिते आहेत,  राज्यसभेमध्ये मी आहे. आम्ही गेले दोन-तीन दिवस बघतोय की तिथले खासदार  देशातल्या अनेक राज्यांचे आम्हाला भेटतात ते दुसरी काहीही चर्चा करत नाहीत,  तर तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात की हे गाव आहे कुठे? हे सबंध देशातल्या समंजस आणि शहाण्या लोकांच्या लक्षात आलं नाही ते या गावकऱ्यांच्या लक्षात कसं आलं? तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन आज देश करतोय याचा आम्हा सर्वांना आनंद आहे.

हे घडलं कशातून? तर परवा झालेली  निवडणूक. निवडणुकीतून निकाल लागतात, लोक निवडून येतात. कधी पराभव होतो,  काही तक्रारी येतात. नाही असं नाही. पण सबंध देशाला, सबंध राज्याला  निवडणुकी संबंधीची आस्था हे असताना त्यांच्या मनात शंका का येते? याचा अर्थ  निवडणूक पद्धतीमध्ये काही शंका निर्माण झाली आणि जो मतदार आहे त्याला  खात्री वाटत नाही. म्हणणं काय? आता आपण EVM द्वारे हे मतदान घेतो. तुम्ही  बटण दाबता त्याच्यानंतर तुम्हाला कळतं आणि तुम्ही समाधानी होता मतदान झालं  म्हणून. पण काही निकाल असे आलेत की त्यामुळे तुमच्या मनात शंका आली. फक्त  तुमच्या मनात नाही, अनेक गावच्या लोकांच्या मनात शंका आली. ते अस्वस्थ  झाले, याच्यात कुठेतरी दुरुस्ती केली पाहिजे. जगात काय केलं जातं? याचा  विचार केला पाहिजे, ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला लागली.

जयंतरावांनी तुम्हाला पोस्टल आणि  ईव्हीएम मतदानाच्या कलाची आकडेवारी सांगितली. त्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की याच्यात काहीतरी गडबड आहे. आम्ही काही माहिती गोळा केली त्या माहितीत काय दिसतं ? की लोकांनी मतदान केलं पण किती लोक निवडून आले? याचे  आकडे त्या मतदानासारखे नाहीत. त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी  शंका आलेली आहे. आता ही घालवायची असेल तर काय करता येईल? एकच गोष्ट आहे की आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल  केला पाहिजे आणि ह्याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली.

मला काही-काही गोष्टींचं आश्चर्य वाटलं मी इथे चार-पाच दिवसांपूर्वी यायचं ठरवलं. त्याचं कारण तुमचं मतदान झालं. त्यानंतर तुमच्या मनात शंका आली. तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेरमतदान घेऊया. ते अधिकृत नव्हतं, सरकारी नव्हतं. तुम्ही गावाने बसून ठरवलं की पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं. हा तुमचा अधिकार होता पण हा निकाल तुम्ही घेतल्यानंतर  पोलीस खात्याने याच्यावर बंदी का केली? कोणता कायदा असा आहे? आज या ठिकाणी मी भाषण करतोय, तुम्ही ऐकताय. उद्या पोलीस खात्याने म्हटलं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही, हा कुठला कायदा? असा कुठे कायदा  आहे? असं असताना तुम्हाला इथे जमायचेच नाही, जमावबंदी तुमच्याच गावात? मोठ्या गमतीची गोष्ट आहे. ते या ठिकाणी का केलं? हे मला समजत नाही. तुमच्या समाधानासाठी तुम्ही पुन्हा मतदान करायचा निर्णय घेतला त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते? तुम्ही हे केलं म्हणून तुमच्यावर खटले भरले. मला काही समजत  नाही. काही गुन्हा केला, चोरी केली, आणखी काही केलं त्याच्यावर खटला भरा. पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं तर त्यासाठी खटला? हा खटला  त्यांनी भरला. गावचे सरपंच आहेत आपले आमदार जानकर आहेत या सगळ्यांना विनंती ही आहे की, याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या. जमाव बंदीचा रेकॉर्ड, इथे काय जो प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय राबवला? त्याची माहिती आणि रेकॉर्ड,  पोलीस खात्याकडून तुमच्यावर केलेले खटले, केस त्याचे रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी आमच्याकडे द्या. आम्ही हे ठिकठिकाणी नेणार आहोत, नेणार कुठे? महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे तुमची तक्रार देऊ, राज्याच्या  मुख्यमंत्र्यांकडे देऊ, देशाच्या प्रधान मंत्र्यांकडे देऊ, देशाचे केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे सुद्धा देऊ.  म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतो आहे. या निवडणूक यंत्रणेचा काळ एकदा सोकावला की तुम्हा सगळ्यांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही.  म्हणून ही सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्यातल्या सगळ्या गावात ठराव करा की, आम्हाला EVM ने मतदान नको जुन्या पद्धतीनेचे पाहिजे. त्या ठरावाची प्रत उत्तमराव जानकरांकडे द्या ते आमच्याकडे देतील.

मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला त्यांनी सांगितलं की, पवारांनी हे करणं योग्य नाही. काय चुकीची गोष्ट केली? तुमच्या गावी येणं चुकीचं आहे? तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे? काही पद्धतींबद्दल लोकांच्या मनात शंका आली त्या शंकेची माहिती घेऊन त्याचं निरसन करण्याच्या  संबंधित काळजी घ्यावी हे चुकीचं आहे? शेवटी लोकशाही कशासाठी आहे? लोकांचे अधिकार काय आहेत? ते अधिकार जतन करण्यासाठी काही अडथळे येत असतील तर  लोकप्रतिनिधींनी त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो इथे आम्हाला राजकारण आणायचं नाही. आम्हाला इथे घडलं, इथल्या  लोकांच्या मनात जी शंका आहे त्या शंकेचं निरसन करायचं आणि असं कुठेही होऊ  नये की, जेणेकरून निवडणूक यंत्रणे बद्दलचा गैरविश्वास हा जनतेमध्ये येईल  एवढीच आमची भूमिका आहे. याच्यात राजकारण यकिंचितही आणायचं नाही.

मी सांगतो तसं ठराव करा आम्ही ही सगळी माहिती राज्य सरकार, केंद्र सरकार, निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ. शक्य झालं आणि  मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं तर मी त्यांना विनंती करीन की तुम्ही स्वतः या  गावात या. लोकांचं म्हणणं ऐका, महिलांचं म्हणणं ऐका आणि त्यांच्या  म्हणण्यात तथ्य असेल तर ते दुरुस्त करण्याच्या संबंधी त्यांना सहकार्य  द्या, हा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे करायला माझी किंवा उत्तमरावांची किंवा धैर्यशीलची अजिबात अडचण नाही. मारकडवाडीचा विषय पार्लमेंटमध्येही मांडून या प्रश्नाला वाचा फुटेल याची काळजी घेऊ.या कामाला उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *