• Sun. May 19th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 1230 Today: 2 Total: 3557054

जनतेच्या हक्क व आशांचे संरक्षण करण्याची जबाबदारी काँग्रेसची !

काँग्रेस सुकाणू समितीच्या बैठकीतील अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे उद्घाटनपर भाषण

नवी दिल्ली, दि. ४ डिसेंबर :

माननीय श्रीमती सोनिया गांधी जी आणि काँग्रेस सुकाणू समितीचे सर्व सन्मानित सहकारी…सुकाणु समितीच्या पहिल्या बैठकीत मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो.. अध्यक्षपदासाठी माझ्यावर विश्वास दाखवलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व सहकाऱ्यांचाही मी आभारी आहे.

श्रीमती सोनियाजी गांधी यांनी कुशल नेतृत्व, अथक परिश्रम व काँग्रेस पायाभूत सिद्धांतावर मोठ्या आत्मविश्वासाने दोन दशके काँग्रेस पक्ष व देशाला मार्गदर्शन दिले, त्याबद्दल मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो व त्यांना धन्यवाद देतो तसेच भविष्यातही त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळत राहिल अशी आशा व्यक्त करतो.

सहकारी मित्रहो, देशासमोर आज असलेली संकटे व आव्हानाबद्दल बोलण्याआधी मी पक्ष संघटना व आपल्यावर असलेल्या जबाबदारीबद्दल बोलतो.

मी असे मानतो की पक्ष आणि देशाप्रती आपली सर्वात मोठी जबाबादारी ही, ‘वरपासून खालीपर्यंतची संघटनात्मक जबाबदारी’ ही आहे. काँग्रेस संघटना मजबूत असेल, उत्तरदायी असेल, लोकांच्या अपेक्षेप्रमाणे खरे ठरलो तरच आपण निवडणुका जिंकू शकू आणि देशातील जनतेची सेवा करू शकू.

सर्वात आधी पक्ष प्रभारी व सरचिटणीस यांनी स्वतःची व संघटनेची जबाबदारी निश्चित करावी. तुम्हाला दिलेल्या विभाग व प्रांतात तुम्ही महिन्यातील १० दिवस भेट देता का ? आपल्याकडे असलेल्या विभागातील प्रत्येक जिल्हा, घटक येथे जाऊन पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे का? स्थानिक समस्या, मुद्दे जाणून घेतले आहेत का? सर्व जिल्हा व ब्लॉक काँग्रेस कमिट्यांची स्थापना झालेली आहे का? लोकांच्या अपेक्षांप्रमाणे आपली संघटना स्थानिक समस्यांसाठी संघर्ष करत आहे का? ब्लॉक व जिल्हा स्तरावर जास्तीत जास्त नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे का? असे किती जिल्हा व ब्लॉक आहेत जेथे पाच वर्षांपासून बदलच केला नाही? अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार जिल्हा, ब्लॉक व प्रदेश पातळीवर देशातील समस्यांसंदर्भात कितीवेळा आंदोलन केले? पक्षाचे जे विभाग, सेल, घटक आहेत त्यांनी त्यांच्या विभागाच्या, घटकांच्या समस्यांबद्दल आवाज उठवला आहे का, ज्यासाठी त्यांची स्थापना करण्यात आली आहे? तुम्ही ज्या राज्याचे प्रभारी आहात त्या राज्यात पुढील ३० ते ९० दिवसांत संघटन व जनहितकारी मुद्द्यांवर आंदोलनाची काय रुपरेषा बनवली आहे?  ज्या राज्यात २०२४ पर्यंत विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या राज्यात निवडणुकीपर्यंचा कृतीकार्यक्रम व वेळापत्रक बनवले आहे का?

जोपर्यंत तुम्ही स्वत:, तुमचे सचिव, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष, पक्षाचे आमदार, खासदार, हे सर्व आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींची ब्ल्यू प्रिंट तयार करून अंमलात आणणार नाहीत, तोपर्यंत आपली जबाबदारी पूर्ण होत नाही. आपले कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडणारे पक्षात अनेकजण आहेत पण असेही काही पदाधिकारी आहेत, काही काम केले नाही तर त्याकडे कोणी लक्ष देणार नाहीत असे त्यांना वाटते, हे बरोबर नाही व खपवूनही घेतले जाणार नाही. जे पदाधिकारी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नाहीत त्यांनी नव्या सहकाऱ्यांना संधी द्यावी लागेल. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण संघटना आणि आंदोलनाची ब्लू प्रिंट तयार करून येत्या १५ ते ३० दिवसांत माझ्याशी चर्चा कराल. काँग्रेस सुकाणू समितीचे सदस्य आणि पक्षाच्या इतर नेत्यांनाही या कार्यक्रमात गरजेनुसार सामावून घेतले जाणार आहे.

मित्रांनो, देशात नवा इतिहास लिहिणारी श्री. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली “भारत जोडो यात्रा” ८८ दिवस पूर्ण करून आता राजस्थानमध्ये दाखल होत आहे. भारत जोडो यात्रेने आता राष्ट्रीय चळवळीचे रूप घेतले आहे. प्रचंड महागाई, भीषण बेरोजगारी, असह्य आर्थिक आणि सामाजिक विषमता आणि देशातील द्वेषाच्या राजकारणाविरुद्ध ही निर्णायक लढाई आहे. राहुल गांधीजी आणि काँग्रेसच्या विचारधारेशी देशातील करोडो जनता जोडलेली आहे, यामध्ये काँग्रेसशी संबंधित नसलेले किंवा आपल्यावर टीका करणारे लोकही मोठ्या संख्येने आहेत. या पदयात्रेचे सर्वात मोठे यश म्हणजे भारत जोडो यात्रेने राष्ट्रीय जनआंदोलनाचे रूप धारण केले आहे.

 

ज्या राज्यांतून ही पदयात्रा गेली आहे, तेथील काँग्रेसजनांनी सर्वसामान्य लोकांसह उत्साहाने आणि धैर्याने आवाज उठवला, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. पण मी तुमच्यासमोर हे देखील सांगू इच्छितो की, हे देशव्यापी जनआंदोलन प्रत्येक गाव, प्रत्येक शहर आणि देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नेण्यात आपण सर्वांची काय भूमिका आहे? जिथे अनेक राज्यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे, तिथली मुलभूत तत्वे आपण प्रत्येक गावात, प्रत्येक शहरापर्यंत पोहोचवू शकलो आहोत का? मला वाटते की आम्ही जे करू शकलो तो एक सार्थक प्रयत्न आहे, परंतु पुरेसा नाही. हे मुद्दे, यात्रेची भावना, यात्रेची तत्त्वे आपल्याला घराघरात पोहोचवायची आहेत. संघटनेच्या सरचिटणीसांनी या संदर्भात ‘हाथ से हाथ जोडो’ हा सविस्तर आराखडा तयार केला आहे, तो तुम्हा सर्वांना देतील. मला आशा आहे की, तुम्ही पक्ष संघटनेला त्याच्या अंमलबजावणीबाबत पूर्ण रूपरेषा द्याल आणि गरज पडल्यास आम्ही त्यावर एकत्रित चर्चा करू.

मी हे सर्व बोललो कारण मोदी सरकार देशातील जनतेवर, त्यांच्या हक्कांवर, त्यांच्या आशांवर आघात करत आहे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची आहे. गरीब, मध्यमवर्गीय किंवा नोकरदारांचे मासिक बजेट बिघडले की ते त्यांच्या जीवावर बेतते. जेव्हा देशाची अर्थव्यवस्थेत उलथापालथ झालेली असते आणि सरकारची ‘पत’ बरोबरच देशाचा रुपयाही घसरत असतो, तेव्हा हा देशाच्या विकासावर आणि प्रगतीवर हल्ला असतो. देशातील कोट्यवधी कर्तृत्ववान तरुणांना रोजगार नसताना आणि सध्या नोकऱ्याही कमी होत असताना हा देशाच्या उपजीविकेवरचा हल्ला आहे. देशातील दलित, आदिवासी, मागास, अल्पसंख्याक, वंचित, शोषित लोकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण असताना आणि सरकार दररोज त्यांचे हक्क दडपून टाकले जातात, तेव्हा तो देशातील कष्टकरी जनतेच्या जिवावरचा हल्ला आहे. जेव्हा देशातील शेतकऱ्याला दिल्लीच्या दारात आत्महत्या करायला भाग पडते आणि (एमएसपी) हमीभावासाठी त्याला आपल्याच सरकारशी संघर्ष करावा लागतो, तेव्हा तो अन्नदात्याच्या जीवावरचा हल्ला आहे. शेजारी देश चीन जेव्हा आमची भूमी बळकावण्याचा आणि रोज नवनवीन सैन्य उभारण्याचा प्रयत्न करत असतो आणि सरकार गप्प बसते तेव्हा हा देशाच्या अखंडतेवरचा हल्ला आहे.

या सर्वांविरुद्ध आणि द्वेषाची बीजे पेरणार्‍या आणि विभाजनाची पेरणी करणार्‍या सत्ताधारी शक्तींविरुद्ध आपल्याला एकत्रितपणे लढायचे आहे. हे राष्ट्रधर्मासोबतच आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

चला तर मग, आपण सर्वजण मिळून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि देशाप्रती आपली जबाबदारी पार पाडूया. काँग्रेसच्या पूर्ण अधिवेशनाबाबतचा अजेंडा आणि इतर मुद्दे तुमच्यासमोर आहेत. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की भविष्यातील रोडमॅपबद्दल तुमचे मत नोंदवा.

धन्यवाद..
जय हिंद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *