शालेय शिक्षणातील शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व..
मुंबई, दि. ९ जुलै ;
या स्पर्धेच्या युगात आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर मानवाला स्पर्धेला तोंड द्यावे लागते. या स्पर्धेतूनच तरुण असो वा बालके यांचे व्यक्तिमत्व खुलत असते आणि आकार घेत असते. सदाहरीत जंगलातील वृक्षांची उंची जास्त असते. त्याचे कारण सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी त्यांच्यात लागलेली स्पर्धा. त्याप्रमाणे यशाची उंची गाठावयाची असल्यास स्पर्धेची सुरुवात ही प्राथमिक शिक्षणापासून होणे गरजेचे बनते.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत आणि सक्तीचे झाले आहे. आरटीई कायद्यानुसार पहिली प्रवेशित विद्यार्थी नापासीची भीती न बाळगता विना अडथळा आठवी उत्तीर्ण होत होता. सन २०२३- २४ पासून शैक्षणिक वर्षाच्या शेवटी इयत्ता पाचवी व आठवीसाठी शैक्षणिक प्राधिकरणामार्फत परीक्षा, पुनर्परीक्षा, त्याच वर्गात ठेवणे-असा बदल झाला आहे. स्पर्धेच्या अभावामुळे विद्यार्थी अपेक्षित उंची गाठण्यात यशस्वी होईल की नाही अशी भिती वाटते. यावर एक उपाय म्हणून मी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या परीक्षांकडे पाहतो. या स्पर्धेच्या युगात आपल्या विद्यार्थ्यांना टिकवायचे असेल तर शिक्षकांनी व पालकांनी या स्पर्धा परीक्षांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगायचे असेल तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट करणे आवश्यक आहे. स्पर्धेची हळुवार सुरुवात ही शिष्यवृत्ती परीक्षेपासून झाली तर आयुष्यातील तीव्र स्पर्धेला तोंड देण्यात हे विद्यार्थी नक्की यशस्वी होतील यात शंका नाही.
*शिष्यवृत्ती परीक्षांवर भर देण्याची अजून काही कारणे सांगता येतील.*
*विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास* — शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यास आपला वैयक्तिक सर्वांगीण विकास साधण्यास मदत करते. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासातील कल वाढतो, त्यास अधिक कष्ट करण्याची सवय लागते .अभ्यासास अधिक वेळ देणे असल्याने लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये वेळेचे नियोजन करण्याची सवय अंगी बाणते. तार्किक विचार करणे, शब्दसंग्रह वाढवणे, वाचन करून आपल्या ज्ञानात भर घालणे, अनुमान लावणे, सामाजिक प्रश्नांवर तर्कसंगत विचार करणे यांसारख्या गुणांचा विकास या परीक्षेच्या माध्यमातून होत असतो. त्यातूनच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व खुलण्यास मदत होते. विद्यार्थी स्वतःची ओळख निर्माण करू शकतो.
*निकोप स्पर्धा व स्पर्धेची तयारी*- पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या माध्यमातून घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आपली गुणवत्ता तपासण्याची संधी मिळत असते. त्यामुळे विद्यार्थी खऱ्या अर्थाने मनापासून वर्षभर या परीक्षेची तयारी करत असतात. शाळाही मुलांच्या अभ्यासाची तयारी करून घेत असतात. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांमध्ये जिंकण्याची निकोप स्पर्धा आणि विजिगीषु वृत्ती तयार होऊ लागते. ही परीक्षाच मुळात स्कॉलर विद्यार्थी निवडणारी स्कॉलरशिप परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भविष्यातील स्पर्धेची तयारीही आपोआपच होत असते.
*शाळेची स्वतःची ओळख निर्माण होते* – शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश प्राप्त करणाऱ्या शाळा स्वतःची ओळख निर्माण करू शकतात. स्पर्धेच्या युगात शाळा सुद्धा स्पर्धांपासून वंचित राहू शकत नाहीत. जिल्हा परिषद शाळांमधील कमी होत असलेली पटसंख्या वाढवणे, पालकांना जिल्हा परिषदेच्या शाळांकडे आकर्षित करणे यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा नक्कीच फलदायी ठरू शकते. पालकांचा कल अशा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या शाळांकडे वाढू शकतो यात शंका नाही. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी शिक्षकांच्या मेहनतीची व पालकांच्या प्रबोधनाची गरज वाटते.
*आर्थिक सहकार्य* – सन २०२३-२४ पासून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीसाठी दरमहा पाचशे रुपये (पुढील तीन वर्षांकरिता) व इयत्ता आठवीसाठी दरमहा 750 रुपये (पुढील दोन वर्षांकरिता) अशी शिष्यवृत्ती मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांना व पालकांना निश्चितच फायदा होईल. शालेय साहित्य खरेदी करणे, इतर शालेय खर्च भागविण्यासाठी सदर रकमेचा निश्चितच फायदा होईल, तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक गुणवत्ताही वाढीस लागेल.
*म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेकडे यशाजवळ पोहोचण्याचा पाया या नजरेतून शिक्षकांनी व पालकांनी पाहिले व स्पर्धेची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून केली पाहिजे. असे झाल्यास आपले विद्यार्थी भविष्यातील स्पर्धात्मक युगात यश मिळवण्यात कधीच मागे पडणार नाहीत.*
लेखक- श्री. हेमंत जनार्दन अधिकारी (प्रा. शिक्षक) जि. प. शाळा – पाली, ता. वाडा, जि. पालघर