मुंबई, दि. २३ जून २०२०
सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी मराठवा, विदर्भातील हजारो शेतकऱ्यांनी केल्या पण शासकीय यंत्रणेला जाग आली नाही. शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कार्यालयाचे खेटे घालावे लागत आहेत पण सरकारीबाबू मात्र खुर्चीतून उठायला तयार नाहीत. कृषी मंत्री दादा भुसे यांनाही आपल्या विभागातील सुस्त कारभाराची चुणुक दिसली. आणि शेतकऱ्यांनी घेराव घातला त्यावेळी मंत्रीसाहेबांना जाग आला. आता त्यांनी या तक्रारींची दखल घेत पडताळणी तातडीने करण्यासाठी तपासणी पथकाची संख्या वाढवावी तसेच याप्रकरणी संबंधित दोषी कंपन्यांवर कडक कारवाई करा, असे निर्देश दिले.
सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन त्याच्या अभ्यासासाठी परभणी कृषि विद्यापीठातील सोयाबीनचे शास्त्रज्ञ आणि कृषि विभागातील अधिकाऱ्यांची समिती नेमली. राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे-खते उपलब्ध व्हावेत यासाठी कृषिमंत्री गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. बीड, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करीत असताना शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कृषिमंत्र्यांकडे केल्या. कृषिमंत्र्यांनी काही शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणीही केली.
वस्तुस्थीती लक्षात येताच उस्मानाबाद, सोलापूर येथिल कृषि आढावा बैठकांमध्ये मंत्रीसाहेबांनी कृषि अधिकाऱ्यांना बियाणे खते शेतकऱ्यांना उपलब्ध होतानाच शेतकऱ्यांच्या कुठल्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका असे बजावले. ज्या शेतकऱ्यांनी महाबीजचे सोयाबीन बियाणे पेरले व ते उगवून आले नाही अशा तक्रारीची तातडीने दखल घेऊन तपासणी अहवालाची वाट न पाहता बियाणे बदलून देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक यांना भुसे यांनी दिल्या. मंत्री साहेबांनी दखल घेऊन आदेश दिले पण खालचे बाबू आता किती तत्परतेने काम करतात हे लवकरच कळेल.
Leave a Comment