Ads

---

ग्रामीण भागात अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी मोठी संधीः सुभाष देसाई

By Xtralarge News

June 18, 2020 11:05 am

Ads

ग्रामीण भागात अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी मोठी संधीः सुभाष देसाई

मुंबई,  दि. १८ जून २०२०

ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात कृषीमाल उपलब्ध असून त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करण्यास मोठी संधी आहे. शिवाय ग्रामीण भागात स्वस्त दरात जमीन उपलब्ध आहे. उद्योग विभाग गुंतवणूकदारांना सर्व सहकार्य करण्यास तयार आहे त्यामुळे आगामी काळात देश-विदेशातील उद्योजकांनी महाराष्ट्रात अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्यावतीने ‘अँडव्हान्सेस इन स्मार्ट फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी’ या विषयावरील वेबिनारमध्ये देसाई प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. देसाई पुढे म्हणाले की, देशातील ६५ टक्के जनता कृषी क्षेत्रावर विसंबून असताना राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा चौदा टक्के हिस्सा असावा हे भूषणावह नाही. फळे, भाज्या वाया जाण्याचे प्रमाणही ३० टक्के इतके असून त्याचे मूल्य सुमारे १ लाख कोटींच्या घरात जाते. त्यामुळे अन्न प्रक्रिया उद्योगांत मोठे काम करण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात कृषी विकास आणि सेवा क्षेत्रासाठी सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय १२ फूड प्रोसेसिंग क्लस्टर आहेत. सोळा हजार छोटे-मोठे अन्न प्रक्रिया करणारे उद्योग आहेत. यात अजून वाढ होण्याची गरज आहे. महाराष्ट्र शासन आणखी पाच फूडप्रक्रिया पार्क सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहितीही देसाई यांनी दिली.

महाराष्ट्राला मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे. किनारपट्टीच्या भागात माशांवर प्रक्रिया, पॅकिंग करण्याची गरज आहे. जगातील अनेक देश कृषीमालाच्या मूल्यवर्धनासाठी प्रयत्न करतात. भारतात तसाच फायदा व्हावा. मार्केटींग, ब्रँडींगक्षेत्रात आपण उतरले पाहीजे. या क्षेत्रात रोजगाराच्या खूप संधी आहेत. स्मार्ट फूड प्रोसेंसिग क्षेत्र जग बदलून टाकू शकते, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.

 

No comments to show.

Leave a Comment