Ads

-

PCM, PCB आणि MBA ची CET वर्षातून दोनदा..

By Xtralarge News

November 11, 2025 9:21 pm

Ads

PCM, PCB आणि MBA ची CET वर्षातून दोनदा..

मुंबई : ११ नोव्हेंबर २५ :

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून आगामी शैक्षणिक वर्षात पीसीएम, पीसीबी व एमबीए या तीन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) दोन वेळेस घेणार असून पहिली प्रवेश परीक्षा एप्रिल २०२६ मध्ये तर दुसरी प्रवेश परीक्षा मे महिन्यात होणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली CET परीक्षा संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ संबधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत म्हणाले, राष्ट्रीय स्तरावर जेईईच्या दोन प्रवेश परीक्षा होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी उपलब्ध होते. तशाच दोन संधी महाराष्ट्रातील मुलांनाही या दोन प्रवेश परीक्षेमधून मिळणार आहे. विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल. जर विद्यार्थ्याने दोन प्रवेश परीक्षा दिल्यास तर त्याला दोन्हीपैकी ज्यामध्ये जास्त गुण असतील ते प्रवेशासाठी गृहीत धरले जातील.

येणाऱ्या वर्षी पीसीएम,पीसीबी व एमबीए या तीन अभ्यासक्रमाच्या पहिली प्रवेश परीक्षा एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात येईल. तर दुसरी प्रवेश परीक्षा मे २०२६ महिन्यात होणार आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक सीईटी कक्ष लवकरच जाहीर करणार आहे.

No comments to show.

Leave a Comment