Ads

--

डोंबिवलीतील स्फोटात ११ ठार व ६० जखमी..

By Xtralarge News

May 24, 2024 10:56 pm

Ads

डोंबिवली, दि. २४ मे :-

एमआयडीसी परिसरातील अमुदान केमिकल कंपनीतील रिऍक्टरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या भीषण स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी एम्स रुग्णालयाला भेट देऊन या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

दुपारी दोनच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी परिसर पुन्हा एकदा भीषण स्फोटाचा आवाजाने हादरला. या स्फोटाचे लोट 2 किलोमीटर लांबूनही दिसत होते. या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की आजूबाजूच्या इमारती आणि कंपन्यांमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत येऊन या घटनास्थळाला भेट दिली.

या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कंपन्यांचे उद्योग,कामगार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचे संचालक यांच्या माध्यमातून ए, बी, सी, आशा तीन श्रेणीत वर्गीकरण करून त्यातील अतिधोकादायक कंपन्या अंबरनाथ एमआयडीसीमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कंपन्याना या जागेचा चेंज ऑफ युज करणे अथवा ही कंपनी अंबरनाथ एमआयडीसी परिसरात विस्थापित करण्याचे पर्याय देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील इतर एमआयडीसी मधील कंपन्यांच्या सुरक्षिततेची देखील तपासणी करण्याचे निर्देश उद्योग मंत्र्यांना दिल्याचे सांगितले. या दुर्घटनेची चौकशी करून ती नक्की का घडली..? याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल असेही यावेळी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले.

घटनास्थळी भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी एम्स रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment