मुंबई, दि. २६ जानेवारी:
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा मोर्चा लाखोंच्या संख्येने मुंबईत दाखल झाला आहे. नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये हा समुदाय जमला असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांची सभाही झाली. या सभेनंतर मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करतील.
मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. मुंबईकरांची आणि मराठा समाज आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी चर्चेसाठी यावे. आरक्षणाची मागणी मान्य करावी. आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही मात्र आझाद मैदानावरच उपोषण करणार असा निर्धार मनोज जरांगे पाटील व्यक्त केला आहे.
राज्य सरकारच्या दोन शिष्टमंडळांनी लोणावळ्यात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. सकाळी जरांगे पाटील यांची यात्रा मुंबईकडे रवाना झाली. जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या असून सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे असे आश्वासन सरकारने दिलेले आहे.
मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने मुंबई पोलिसांना नोटीस पाठवली होती. हायकोर्टाने दिलेल्या आदेशामुसार मुंबई पोलिसांनी जरांगे यांना नोटीस पाठवली आहे. आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क मैदानात आंदोलनासाठी परवानगी नसल्याचा उल्लेख या नोटीशीत करण्यात आला आहे. जरांगे पाटील यांनी खारघरच्या मैदानात आंदोलन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी समर्थकांसह मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु ठेवला आहे.
Leave a Comment