माओवाद्यांचा शहीद सप्ताह असतानाही नक्षलग्रस्त दुर्गम भागाला भेट !
मुंबई, 3 ऑगस्ट
गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र छत्तीसगढ़ सीमेवरील अतिदुर्गम पातागुडम या नक्षलप्रभावित गावाला भेट दिली. माओवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू असताना शिंदे यांनी ही भेट दिली हे विशेष. हे गाव गडचिरोलीपासुन तीनशे किमी दूर दुर्गम भागात आहे. या संवेदनशील परिसरातील गावांना भेट देत तेथील परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला तसेच नक्षलवाद्यांच्या त्रासाला बळी पडलेल्या नागरिकांशी त्यांनी चक्क तेलुगु भाषेतून संवाद साधला. राज्य सरकार तुमच्या पाठीशी खंबीर उभे असल्याची ग्वाही देत शिंदे यांनी आर्थिक मदतही केली.
गडचिरोली जिल्हा दौऱ्यांतर्गत सिरोंचा तालुका ग्रामीण रुग्णालय येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटर तसेच अहेरी तालुक्यातील अल्लापल्ली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरलाही मंत्री शिंदे यांनी भेट देत तेथील व्यवस्थापनाची पाहणी केली.
त्यानंतर सिरोंचा तालुक्यातील पात्तागुडम येथील पोलीस स्थानकाला भेट देऊन तेथील पोलीस, एसआरपीएफ, बीएसएफ जवानांकरिता उभारण्यात आलेल्या वसतिगृह तसेच कॅन्टीन व इतर व्यवस्थापनाची पाहणी केली.
पातागुडम या गावाला भेट देणारे एकनाथ शिंदे हे पहीलेच मंत्री. या गावाने आमदार सोडुन कधी मंञी बघीतला नव्हता. तीन महीन्यापुर्वी या गावात वीज आली तर पाच वर्षापुर्वी पहील्यांदा या गावात निवडणुक झाली.
मुंबईपासुन सर्वाधिक लांब अंतर असलेले राज्यातील शेवटच्या टोकावर हे गाव आहे. पालकमंत्री म्हणून आर आर पाटील यांच्या पावलांवर पाऊल टाकत एकनाथ शिंदे यांनी दुर्गम भागाला भेट दिली. आर. आर. पाटील यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वतः मागून घेतले आणि वारंवार गडचिरोलीला भेटी देऊन विकासासाठी झटले.









