मंत्रीजी, शेताच्या बांधावर राहुद्या, दुकानात तरी खतं मिळू द्या!

शिर्डी, दि. १५ जुलै २०२०

शेतकऱ्याच्या बांधावर जाणारा कृषीमंत्री म्हणून दादा भुसे यांची ख्याती झाली आहे. ते तडफदार मंत्री आहेत. शेतकऱ्यांबदद्ल त्यांना कळवळा आहे हे त्यांच्या कामातून वारंवार दिसून येत आहे.खतांसाठी शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे समजताच कृषीमंत्र्यांनी स्टिंग ऑपरेशन करुन नाशिकमधल्या एका दुकानदाराची चांगलीच उतरवली..मात्र त्यांच्या विभागातील अधिकारीच त्यांना साथ देत नाहीत असे दिसते. मंत्री स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर खतं देण्यास सांगत असताना राज्यात तशी परिस्थिती आहे का….हाच मुद्दा घेऊन माजी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दादा भुसे यांनी आरसाच दाखवला आहे.

विखे पाटील म्हणतात, खतांच्‍या टंचाईमुळे शेतक-यांसमोर गंभीर समस्‍या निर्माण झाली आहे. कृषि विभागाच्‍या नियोजनाअभावी ऐन खरीप हंगामात पेरणीलाच खोडा झाल्‍याने शेतकरी हवालदील झाले आहेत. उपलब्‍ध नसलेली खतं आणि बियाणांमध्‍ये  झालेली फसवणूक यामुळे खरीप हंगाम वाया जाण्‍याची शेतक-यांमध्‍ये निर्माण झालेली भिती लक्षात घेवून कृषि विभागाने खतांसाठी तातडीने उपाययोजना कराव्‍यात.

यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्‍याने राज्‍यातील शेतक-यांनी खरीप हंगामाच्‍या पेरणीची तयार उत्‍साहाने सुरु केली होती. तथापी आवश्‍यक खते उपलब्‍ध न झाल्‍याने शेतक-यांचे कष्‍ट वाया जाण्‍याची भिती व्‍यक्‍त करतानाच कोणत्‍याही जिल्‍ह्यात मागणीप्रमाणे खतांचा पुरवठा होवू शकलेला नाही. युरीया खताची उपलब्‍धता कमी झाल्‍याने लिकींग तक्रारीही मोठ्या प्रमाणात झाल्‍या आहेत. अनावश्‍यक खतं आणि रसायनांची सक्‍तीने खरेदी करायला लावून शेतक-यांना आर्थिक भुर्दंड दिला जात आहे.

राज्‍यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्‍याने सोयाबीन बियणांची मागणीप्रमाणे उपलब्‍धता झाली नाही. अनेक कपंन्‍याकडुन निकृष्‍ठ प्रतीचे बियाणे शेतक-यांच्‍या पदरात पडल्‍याने त्‍याची उगवण झाली नसल्‍याच्‍या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्‍त झाल्‍या आहेत. सरकारकडुन आणि कंपन्‍याकडुन शेतक-यांना कोणताही न्‍याय मिळाला नाही. त्‍यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतक-यांपुढे उभे राहीले आहे. सरकारकडुन कोणतीही मदत मिळत नसल्‍याने शेतक-यांना अखेर न्‍यायालयात दाद मागवी लागत आहे. कृषि विभागाच्‍या दुर्लक्षामुळे शेतक-यांच्‍या हातून हा खरीप हंगाम वाया जात असल्‍याचे आ. विखे पाटील यांनी म्हटले आहे.

कोरोना संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्‍या शेतक-यांना चालू खरीप हंगाम हाच एक दिलासा देणारा आहे. त्‍यामुळेच मोठ्या अपेक्षा ठेवून शेतक-यांनी खरीप हंगामाची तयारी केली. परंतू कृषि विभागाचा हलगर्जीपणा व नियोजन शुन्‍यतेचा मोठा फटका शेतक-यांना सहन करावा लागला. ही वस्‍तुस्थिती लक्षात घेवून, खतांसाठी शेतक-यांच्‍या दुकानांपुढे लागत असलेल्‍या रांगा, शेतक-यांना पावत्‍या न देता खते आणि बियाणे विक्री, खतांचे लिकींग, करणा-या कृषिसेवा केंद्रांची चौकशी करुन कारवाई करण्‍याची मागणी आ.विखे पाटील यांनी केली आहे.

Leave a Comment