ऍड. याज्ञवल्क्य जिचकार प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव!

0
youth 55

नागपूर दि. १२ जुलै २०२०

काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते डॉ. श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र अॅड. याज्ञवल्क्य जिचकार यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिचकार यांच्याकडे संशोधन विभागाच्या प्रमुख समन्वयकपदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे.

डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या दुर्दैवी निधनानंतर तब्बल १६ वर्षांनंतर त्यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदाची जबाबदारी देऊन सक्रिय राजकारणात काम करण्याची संधी दिलेली आहे. विधी शाखेची पदवी प्राप्त याज्ञवल्क्य जिचकार हे नागपुरातील प्रख्यात सामाजिक संस्था डॉ. श्रीकांत जिचकार फाउंडेशन व ‘झीरो ग्रॅव्हीटी’ चे सहसंस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून काम करीत आहेत. समाजातील युवा शक्तीचे एकत्रीकरण करून त्यांच्या ज्ञानाचा व कौशल्याचा उपयोग विधायक कार्यासाठी व्हावा हा जिचकार यांच्या संस्थेचा उद्देश आहे. यासोबतच याज्ञवल्क्य जिचकार हे दिवंगत ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांनी स्थापन केलेल्या ‘सांदीपनी’ सोसायटीचेही विश्वस्तही आहेत.

एन. एस. यु. आय. व युवक काँग्रेस या संघटनांच्या माध्यमातून अनेक वर्षे नेतृत्व केलेल्या डॉ. श्रीकांत जिचकार यांनी काँग्रेस विचारांच्या उच्चशिक्षित तरुणांची फळी संपूर्ण महाराष्ट्रात उभी केली होती. अनेक पदव्यांनी विभुषीत डॉ. श्रीकांत जिचकार यांना मानणारा मोठा वर्ग आजही राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. राष्ट्रीय व राज्य स्तरावरील अनेक नेते त्यांना आपला आदर्श मानतात.

जिचकार यांच्यानंतर अनेक वर्षांनी पक्षाने त्यांच्या मुलाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी दिली आहे. काँग्रेस पक्षाने एका उच्चविद्याविभूषीत तरुणाला नेतृत्वाची संधी दिल्याने राज्यभरातून पक्षाच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. डॉ. जिचकार यांच्याप्रमाणेच त्यांचे सुपुत्रही आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करतील अशा सदिच्छा जिचकार यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती केल्याबद्दल अॅड. याज्ञवल्क्य जिचकार यांनी काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी, खा. राहुलजी गांधी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांचे आभार मानून राज्यभरातील युवकांना पक्षाशी जोडून युवक काँग्रेस मजबूत करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *