Ads

---

‘कोरोनामुक्त’ लोकांवर सामाजिक बहिष्कार घालणे गुन्हा!

By Xtralarge News

July 8, 2020 7:53 pm

Ads

अमरावती, दि. ८ जुलै २०२०

कोरोनाचे संकट संपले नसताना दररोज नव्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे या रोगावर नियंत्रण मिळवणे व खबदारी घेणे हे असताना दुसरीकडे काही लोक कोरोनामुक्त झालेल्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. अमरावती जिल्ह्यातही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.

दीड महिन्यांपूर्वीच कोरोनामुक्त झालेल्या नांदगावपेठ येथील एका महिलेच्या कुटुंबावर काही नागरिकांनी अप्रत्यक्ष बहिष्कार टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची दखल घेत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी नांदगाव पेठकडे धाव घेऊन त्या महिलेची भेट घेतली व तिला दिलासा दिला.

कोरोना हा योग्य उपचारानंतर पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे असा आजार झालेल्या व्यक्तीविषयी बहिष्काराची भावना जोपासणे अत्यंत चुकीचे आहे. आपण स्वत: सोडून इतर सर्वांना कोरोना होण्याची शक्यता आहे, असे समजून कुणीही वागू नये. ही महामारी असल्याने या आजाराची जोखीम सर्वांना समान आहे. त्यामुळे कुणी बाधित होत असेल तर सहवेदना बाळगली पाहिजे. हा आजार उपचाराने पूर्णपणे बरा होणारा आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या आपल्याच भगिनीला वाळीत टाकण्याची भावना ठेवणे हाच मुळात एक मानसिक आजार आहे. त्यामुळे कुणीही बहिष्काराची मानसिकता बाळगू नये व कारवाई करायला भाग पाडू नये, असे ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

कोरोनामुक्त झालेल्या या महिलेची व तिच्या कुटुंबाची तब्येत ठणठणीत असल्याचा वैद्यकीय अहवाल आहे. कोरोनाची कुठलीही लक्षणे आता त्यांच्यात नाहीत. अशा वेळी नागरिकांनी त्या भगिनीला हीन वागणूक देणे हा गुन्हा आहे. दवाखाने, रूग्णालये यांनीही रुग्णांना सन्मानजनक वागणूक दिली पाहिजे. यानंतर इतरत्र कुठेही असा प्रकार घडता कामा नये. असा प्रकार कुठेही घडल्यास कठोर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिली.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी या महिलेच्या घरी भेट देऊन तिची व तिच्या कुटुंबियांची विचारपूस केली व या भगिनिला आपुलकीने जवळ घेऊन दिलासा दिला.

No comments to show.

Leave a Comment