DADA bHUSE

यवतमाळ, दि. ६ जुलै २०२०

राज्यात सोयाबीन बियाणे उगवणाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी मिळाल्या असून तक्रारींचा हा आकडा राज्यात ३० हजारांच्या जवळपास असून यापैकी ५० ते ६० टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. असे असले तरी बियाणे उगवण संदर्भातील तक्रारींबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यात दोषी असलेल्या कंपन्यांवर निश्चितच कारवाई करण्यात येईल, असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी शेतक-यांना दिला.

ज्या कंपन्याचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही अशांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाचे महामंडळ असलेल्या महाबीजच्या बियाणांबाबतही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र महाबीजतर्फे शेतक-यांना बियाणे बदलवून देण्यात येत आहे. तरीसुध्दा तक्रारींची गंभीर दखल घेण्यात येईल. कपाशीच्या बीटी-3 वाणाला परवानगी देण्याची मागणी शेतक-यांनी केली असता कृषीमंत्री म्हणाले, कापूस बीटी-3 हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो. या वाणाचा पर्यावरणीयदृष्ट्या काय परिणाम होतो, याबाबत संशोधन सुरू आहे. कपाशीच्या या वाणाला केंद्राच्या आदेशानुसारच परवानगी देता येते.

शेतक-यांची प्रगती झाली पाहिजे, त्यांच्या हातात दोन पैसे जास्त मिळून तो चिंतामुक्त झाला पाहिजे यासाठी शासन कटिबध्द आहे. भविष्यात सोयाबीन आणि कापूस संदर्भात योग्य मार्गक्रमण करण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे. शेतक-यांच्या बांधावर जाऊन अनुभव घेणे, त्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करणे, नवीन तंत्रज्ञानाबाबत त्यांना अवगत करणे, शेतक-यांच्या सुचनांवर अंमल करणे यादृष्टीने कृषी विभाग काम करीत आहे, असेही दादा भिसे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *