कोरोनावर भारताने विकसित केली पहिली स्वदेशी लस !!
मुंबई, दि. ३ जुलै २०२०
कोरोनावर कोणतेही औषध अथवा लस बनवण्यात अजून तरी यश आलेले नाही. देश विदेशातील अनेक संस्था यासाठी सातत्याने संशोधन करत आहेत. यात एक दिलासा देणारी मोठी घटना घडली आहे, ती म्हणजे भारताने कोरोनावरची पहिली स्वदेशी लस बनवण्यात यश मिळवले आहे. हे व्यवस्थित पार पडले तर १५ ऑगस्टला ही लस लाँच करण्याचा मानस मोदी सरकारने निश्चित केला असून त्यादृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
कोरोनाची लागण भारतात मोठ्या संख्येने होत असून दररोज रुग्णसंख्या वाढतच आहे. या महामारीने सर्व व्यवहारच ठप्प केल्याने मोठे नुकसानही होत असल्याचे लक्षात घेता तातडीने पावले उचला व चाचण्यांचे क्लिनीकल ट्रायल्स घ्या, अशा कठोर शब्दात या लसीच्या चाचण्या घेणाऱ्या हॉस्पिटल्सना ताकीद देण्यात आल्याचे समजते.
ही लस भारत बायोटेक कंपनीने तयार केली असून केंद्र सरकारने या लसीची मानवी चाचणी घेण्यासाठी परवानगी दिलेली आहे. भारत बायोटेक कंपनीने आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी यांच्याबरोबर संयुक्तरितीने ही लस तयार केली आहे.
कोवॅक्सिन (Covaxin) असे या लसीचे नाव आहे. मानवावर या लसीची याच महिन्यात चाचणी पूर्ण करुन १५ ऑगस्टपर्यंत ही लस भारतात लाँच करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. भारताने विकसित केलेली ही पहिली स्वदेशी लस आहे आणि सरकारने या प्रकल्पाला सर्वात जास्त प्राधान्य दिलेले आहे.
सर्व काही सुरुळीत पार पडले तर १५ ऑगस्टपासून ही लस बाजारात येऊ शकते.
