कोरोनामुळे पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ नियंत्रित संचारबंदी!

0
20210221_182014

कोरोनामुळे पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ नियंत्रित संचारबंदी !

पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद..

 

पुणे, दि. २१ फेब्रुवारी :
पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येतील. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत नियंत्रित संचार राहील, याची अंमलबजावणी करा. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी २०० व्यक्तींच्या मर्यादेत लग्न समारंभ होतील, याची दक्षता घ्या, असे निर्देश देवून कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सोमवार दिनांक २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. कोरोना विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाय योजनांबाबत, तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर आवश्यक ते उपाय सुचवून त्यांची तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सूक्ष्म नियोजन करा. शहर व ग्रामीण भागात हॉटस्पॉटनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवा. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा. संपर्क शोध मोहीम (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) अधिक प्रभावीपणे राबवा. शासकीय आणि खाजगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासण्या वाढवा. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करा असे सांगून कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होवून संसर्ग रोखण्यात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी त्यांनी फ्ल्यू सदृश्य रुग्णांची तपासणी करुन घ्यावी असेही अजित पवार यांनी सांगितले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दीत जाणे टाळणे, सामाजिक अंतर पाळणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर आदी प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०० व्यक्तींच्या मर्यादेत लग्न, कौटुंबिक व राजकीय कार्यक्रम होतील याची दक्षता घ्या. जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवावीत. मात्र अभ्यासिका निम्या क्षमतेने नियम पाळून सुरू राहतील याची खात्री करा. हॉटेल, बार रात्री ११ पर्यंतच सुरु राहतील याची दक्षता घ्या, असे सांगून रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान नियंत्रित संचाराची अंमलबजावणी करा. वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे या अत्यावश्यक सेवांना सूट द्या. जिल्ह्यात सर्वत्र कोविड केअर सेंटर तात्काळ सुरु करा. मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा अशा सूचना दिल्या.

आरोग्य व्यवस्था सक्षम होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना गतीने करा, असे सांगून ससून रुग्णालयाला आवश्यक मनुष्यबळ व यंत्र सामुग्री पुरविण्यात येईल, असेही अजित पवार यांनी सांगितले.

जिल्ह्यात लॉकडाऊन नाही; मात्र नियमांची कडक अंमलबजावणी…

▪️२०० व्यक्तींच्या मर्यादेत लग्न, कौटुंबिक व राजकीय कार्यक्रम

▪️रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान नियंत्रित संचाराची अंमलबजावणी (अत्यावश्यक सेवा- वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे वगळून)

▪️हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रीत करा.

▪️मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करुन उपाययोजना प्रभावीपणे राबवा.
▪️जिल्ह्यात कोविड केअर सेंटर सुरु करा.
▪️नमुना तपासण्यांची संख्या वाढवा.
▪️ मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा.

▪️नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *