Amazon वर आता कुरडई, सरगुंडे, शेवई, मुंगवडी !

0
Bachat Gat rr

मुंबई, दि. १ जुलै २०२०

मोबाईल, टॅब, विविध गॅझेट्स, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह बहुसंख्य वस्तुंची ऑनलाईन ऑर्डर करणाऱ्यांसाठी आता गावाकडील चवीचे पदार्थही आता Online ऑर्डर करता येणार आहेत. कुरडई, सुरगुंडे, शेवई, मुंगवडे, पापड यासारख्या बचत गटांनी बनवलेल्या वस्तू आता Amazon आणि GeM या Online प्लॅटफार्मवर उपलब्ध झालेल्या आहेत.

बचतगटांची उत्पादने ही ॲमेझॉन (Amazon) आणि जीईएम (GeM) या Online प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आल्यामुळे बचतगटांना व्यवसाय आणि ग्राहकांना त्यांच्या आवडत्या वस्तू सुलभरित्या घरपोच मिळणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

स्वयंसहाय्यता समुहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उमेद अभियानामार्फत विविध स्तरावर सरस प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते. या स्वयंसहाय्यता समुहांनी तयार केलेल्या उत्पादनांना वर्षभर मागणी राहते. त्यामुळे प्रदर्शन संपल्यानंतरही ग्राहकांना बचत गटांच्या वस्तू वर्षभर मिळाव्यात यासाठी अॅमेझॉन व जीईएम (GeM) सारखी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सध्या अॅमेझॉनवर ३३ तर जीईएम पोर्टलवर ५० उत्पादनांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे या उत्पादनांना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होत आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

प्रायोगिक तत्वावर कागदी बॅग्स व टेराकोटा दागिने अशा दोन उत्पादनांची नोंदणी या संकेस्थळावर करण्यात आली होती. याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता ३३ उत्कृष्ठ उत्पादनांची या संकेस्थळांवर नोंदणी करण्याचे ठरले. वर्धा जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समुहांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची नोंदणी ॲमेझॉन संकेतस्थळावर करण्यात आली आहे. ॲमेझॉनवर सध्या ३३ उत्पादने अपलोड केली आहेत. यामध्ये विविध प्रकारचे पापड, पेपर बॅग, टेराकोटा ज्वेलरी, सरगुंडे, कुरडई, हळद पावडर, मसाले, रेशमी ज्वेलरी, शेवई, मुंगवडी, न्युट्री बिस्किट, मास्क यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *