कृषीक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांना अभिवादन !

0
Vasantrao Naik

मुंबई, दि. १ जुलै २०२०

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रालयात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्त अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना, जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘कृषीक्रांती’ घडवून महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे नेणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यांच्या दूरदृष्टी व कर्तृत्वामुळे सदैव स्मरणात राहतील, त्यांचे विचार, कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देतील. स्वर्गीय नाईक साहेबांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. ते हाडाचे शेतकरी होते. ‘शेती आणि शेतकरी’ हे त्यांच्या जिव्हाळ्याचे, अभ्यासाचे विषय राहिले. शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात ‘कृषी विद्यापीठां’ची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली.

१९७२ च्या दुष्काळाचे संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारले आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला. राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशा दिली. ‘रोजगार हमी योजने’तून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत केला. ‘संकटाच्या काळात शासकीय मदतीचे धोरण लवचिक असले पाहिजे’ हा विचार त्यांनीच दिला. त्यांचा जन्मदिवस ‘कृषी दिन’ म्हणून साजरा करत असताना नाईक साहेबांनी दाखवलेल्या ‘कृषी विकासा’च्या वाटेवरच राज्य सरकार वाटचाल करत असून, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिला आहे.

यावेळी मुख्य सचिव संजयकुमार, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशू सिन्हा आदींसह मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *