20210119_093344

उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया..

बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये ‘कृषी तंत्रज्ञान सप्ताहा’स सुरुवात.

पुणे, दि. 19:
उपलब्ध बाजारपेठेचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे सांगून उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा शरद पवार यांनी केले.

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये दि.18 ते 24 जानेवारी 2021 या कालावधीत “कृषिक” या कृषि तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषि तंत्रज्ञान सप्ताहास खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार  व अन्य मंत्री महोदयांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, भारतीय अनुसंधान परिषदेचे महासंचालक त्रिलोचन मोहपात्रा(ऑनलाईन), राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, उपसंचालक सुरेश चौधरी, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र पवार व सुनंदा पवार, बायर कंपनीचे डॉ. सुभाष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व सॉलिडारिडार, आशिया या संस्थांमध्ये करण्यात आलेल्या कराराच्या (एमओयु) प्रतीचे हस्तांतरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेच्या 50 वर्षातील वाटचालीविषयी बनविण्यात आलेल्या चित्रफितीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

खासदार शरद पवार म्हणाले, गहू, तांदळाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे. बाजारपेठेनुसार शेती पिके घेतल्यास उत्पादनाला चांगला भाव मिळतो. यासाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध डाळी व फळपिकांचे उत्पादन देखील शेतकऱ्यांनी घ्यायला हवे.  शेतीसाठी ‘पाणी’ हा घटक महत्त्वाचा आहे. शेतीसाठी किती प्रमाणात आणि कशा प्रकारे पाण्याचा वापर करायचा याची माहिती शेतकऱ्यांना होणे आवश्यक असते. यादृष्टीने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर ‘कृषिक’ सप्ताहाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली, असे सांगून खासदार शरद पवार म्हणाले, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विस्ताराचे काम दिवंगत आप्पासाहेब पवार यांनी केले, तर संस्थेत आधुनिकता आणण्यासाठी राजेंद्र पवार यांनी परिश्रम घेतले. संस्थेला 50 वर्षे पूर्ण होत असून संस्थेच्या वाटचालीसाठी अनेक मान्यवरांचे सहकार्य मिळाल्याचेही खासदार पवार यांनी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन शेतीविषयक विविध औजारे, तंत्रज्ञान व शेती उत्पादनांच्या प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. यानंतर डेअरी प्रकल्प केंद्राला भेट देऊन येथील विविध सोयी-सुविधांची पाहणी केली. यानंतर माळेगाव खुर्द येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेला (एनआयएएसएम) भेट देऊन पाहणी केली. यावेळी खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मान्यवरांनी नियोजित सायन्स पार्कला भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रात्याक्षिकांची पाहणी करुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

“कृषिक” कृषी तंत्रज्ञान सप्ताहाला सुरुवात….

राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधक संस्था, अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि बायर कंपनी यांच्या प्रयत्नातून हा कृषि तंत्रज्ञान सप्ताह  पार पडत आहे. दरवर्षीच्या कृषिक  प्रदर्शनातील प्रक्षेत्र भेटीसह  फूड प्रोसेसिंग, डेअरी टेक्नॉलॉजी, प्रक्रिया उद्योग, मार्केटिंग ब्रँडिंग आदी तंत्रज्ञानाचा यात समावेश आहे. याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण  खाद्य पदार्थांच्या प्रक्रिया उद्योगांचे लाईव्ह डेमो पाहता येत आहेत. याठिकाणी कृषी तंत्रज्ञानासह  शेतीविषयक विविध प्रयोगांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर आदी खबरदारी घेऊन याठिकाणी शेतकऱ्यांना प्रवेश देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *