मुंबईतील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंदच!

0
20201209_100738

मुंबईतील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंदच!
मुंबई, दि. ३० डिसेंबर:
कोरोनाने अख्खे जग वेठीस धरले आहे. परिस्थिती सुधारत असल्याने महाराष्ट्रातही जनजीवन पूर्वपदावर येत आहे काही ठरावीक क्षेत्र वगळता अनेक व्यवहार सुरु करण्यात आले आहेत परंतु शाळा, कॉलेजेस मात्र अजून सुरु करण्यात आलेली नाहीत. १ जानेवारीपासून शाळा सुरु करण्याची तयारी सुरु असतानाच नव्या विषाणुमुळे पुन्हा त्यात व्यत्यय आला आहे.

ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. याआधी ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आल्या होत्या.

करोनाचा संसर्ग कमी होत असला तरी नव्या विषाणू प्रकाराने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यातच अनेक लोक नववर्ष स्वागतासाठी मुंबईबाहेर गेल्याने ते परतल्यावर ही संख्या वाढू शकते, असा अंदाजही बांधला जात आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात केली. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नववी व बारावीचे वर्ग नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहेत. मात्र अंतिम निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेचा असल्याने मुंबईसह, ठाणे आणि परिसरातील इतर महापालिकांनी ३१ डिसेंबरपर्यंत शाळा व कॉलेजे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

१ जानेवारीपासून शहरातील शाळा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना नव्या कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेत पुन्हा एकदा शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *