जानेवारीपासून महाराष्ट्रात कोरोना लसीकरण?
जानेवारीपासून राज्यात कोरोना लसीकरण?
मतदानासारखेच लसीकरणासाठी बूथ उभारणार..
पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांना कोरोना लस.
मुंबई, दि. १८ डिसेंबर:
कोरोनाची लस केव्हा दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून वेगवेगळ्या तारखा दिला जात आहेत. पण हे लसीकरण लवकरच होईल अशी चिन्हं दिसत आहे. सीरम आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांनी लसीसाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत केंद्राने परवानगी दिली तर जानेवारीपासून महाराष्ट्रात कोरोनाची लस देण्यास सुरुवात होऊ शकते, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आरोग्य मंत्री टोपे यांनी यावेळी लसीकरण कशा पद्धतीने केले जाणार आहे याचीही माहीती दिली. मतदानासाठी ज्या पद्धतीने बूथ उभारले जातात त्याच पद्धतीने लसीकरणासाठी बूथ उभारले जाणार आहेत. कोविड नावाच्या पोर्टलवर रजिस्टर असणाऱ्या प्रत्येकाला ज्या तारखेला लसीकरण करण्यात येणार आहे त्या तारखेला एक मेसेज मिळेल. तो मेसेज आल्यावर संबंधित ठिकाणी ओळखपत्रासह जायचे आहे. ओळख पटल्यावर तुम्हाला लस दिली जाईल. त्यानंतर तिथे अर्धा तास थांबवून नंतर घरी पाठवलं जाईल.
लसीकरणासाठी राज्य सरकारची तयारी पूर्ण होत आली आहे. १८ हजार कर्मचाऱ्यांना त्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत असून ते अंतिम टप्प्यात आहे. लसीकरण कशाप्रकारे करायचे याची आखणी केंद्र सरकारच्या सूचनांनुसार करण्यात आली आहे. लसीच्या स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था पूर्ण झाली आहे.आता केवळ केंद्राच्या निर्णयाची आणि परवानगीची प्रतीक्षा आहे, असेही टोपे यांनी सांगितले.
लसीकरणाऱ्या पहिल्या टप्प्यात राज्यातील तीन कोटी नागरिकांना लस दिली जाईल. शिवाय देशातील सर्व राज्यांनी मोफत लस मिळावी अशी मागणी केंद्राकडे केली आहे. केंद्र सरकारने कोरोनावरील लस मोफत दिली नाही तरीही महाराष्ट्र सरकार नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नाही असेही टोपे म्हणाले.
