दुसरी लाट आली तर मुंबई महापालिका तयार!
दुसरी लाट आली तर BMC तयार !
कोविड सेंटर, बेड्स, औषध साठा तयार….
मुंबई, दि. २३ नोव्हेंबर :
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. विशेषतः दिवाळीसाठी लोकांनी बाजारात गर्दी केल्यानंतर मुंबईसह इतर भागातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. दिल्लीतही कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसत.या पार्श्वभूमिवर मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभागही सज्ज झाला आहे.
मुंबई महापालिकेने रुग्णालय आणि कोरोना सेंटरमधील बेड तयार ठेवले आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरही तयार ठेवण्यात आले आहेत. ७० हजार बेडपैकी २० हजार बेड गंभीर रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. सध्या ५८ कोविड सेंटर कार्यरत आहेत त्यातील १० टक्के बेड भरले आहेत. तसेच ३५ कोविड सेंटर २ दिवसांत सुरु करता येऊ शकतात तर ४०० सेंटर ही ८ दिवसांत सुरु करता येऊ शकतात. मुंबईत ५०० पेक्षा जास्त कोविड सेंटर महानगरपालिकेने उभी केली होती.
महापालिकेच्या सर्व दवाखान्यात कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईतील व्यावसायिकांची कोविड वैद्यकीय चाचणीसाठी महापालिकेने विशेष मोहीमही सुरु केली आहे. दुकान, हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी, बेस्टचे चालक-वाहक यांच्या कोविड चाचणी नियमितपणे करण्यात येत आहेत.
