जाणून घ्या रुक्मिणीमातेच्या पालखीची पंरपरा !.

0
Pandharpur mandir 1111

अमरावती, दि. २३ जून २०२०

माता रुक्मिणीचे माहेर असलेल्या कौंडण्यपूर येथील आई रुक्मिणीची पालखी यंदाही आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणार आहे. ४२५ वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या या पालखीत कोरोना संकटामुळे खंड पडणार नाही. आवश्यक ती दक्षता घेऊन पालखी पंढरपूरकडे रवाना होईल, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी राज्यातून पंढरपूर येथे पालख्या येत असतात.सध्याचे कोरोना महासंकट लक्षात घेऊन पालख्यांवर काहीशी मर्यादा आली असली तरी शासनाने राज्यातील नऊ पालख्यांना मान्यता दिली आहे. कौंडण्यपूर येथील सव्वाचारशे वर्षांची प्राचीन परंपरा लक्षात घेऊन ही परंपरा अखंडित राहावी यासाठी शासनाची मान्यता मिळविण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी प्रयत्न केले. विदर्भातील ही प्राचीन पालखी परंपरा अबाधित राहणार आहे. आई रुक्मिणीची पालखी यंदाही पंढरपूरला जाणार असल्याने विदर्भातील वारकरी, भाविकांकडून आनंद व्यक्त होत आहे.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिका-यांनी तसे पत्र क्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रूख्माई संस्थानच्या विश्वस्तांना पाठवले असून या पालखीसोबत येणा-या भाविकांची नावे मंदिर समितीस कळविण्याबाबत पत्र संस्थानला देण्यात आले आहे.

श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे श्रीकृष्णपत्नी रुक्मिणीचे माहेर आहे. येथे कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते. आषाढी एकादशीला येथून सुमारे ४२५ वर्षांपासून पालखी पंढरपूरला जाते. रुक्मिणी मातेची पालखी ही पहिली मानाची पालखी मानली जाते. सव्वाचारशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि विविध शतकांतील संत महात्म्यांच्या सहवासाने पुनित झालेली ही पालखी केवळ विदर्भातीलच नव्हे, तर समस्त महाराष्ट्रातील लोकांच्या श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्राचे हे सांस्कृतिक संचित आहे. त्यामुळे कोरोना संकट आले तरी ही परंपरा खंडित होऊ दिली नाही. योग्य ती दक्षता घेऊन पालखी नेण्यात येईल, असे पालकमंत्री ठाकूर यांनी सांगितले.

कौंडण्‍यपूर ही विदर्भ राज्याची राजधानी होती. प्राचीन काळात दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणून त्याला मान्यता होती. अयोध्येसारख्या प्राचीन शहरांशी त्या काळात हे ठिकाण जोडलेले होते. माता रुक्मिणीचे माहेर असल्याने आषाढी यात्रेसाठी श्री क्षेत्र पंढरपूरला अखंडितपणे पालखी जाते. ही पालखी परंपरा विदर्भातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *