बळीराजाची दिवाळी सरकारमुळे अंधारातच!
देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर आरोप.
मुंबई, दि. १४ नोव्हेंबर
देशभरात दीपोत्सवाचे पर्व साजरे होत असताना बळीराजा मात्र मदतीविना संकटात आहे. त्याची दिवाळी महाविकास आघाडी सरकारने अंधारातच ठेवली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, बळीराजा संकटात असताना त्याची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी सरकारकडे मागण्या करण्यात आल्या, सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. पण सरकार दाद द्यायलाच तयार नाही. बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहताना भाजपाने अनेक ठिकाणी बेसन-भाकर आंदोलन केले.
दीपोत्सवाचे पर्व साजरे होत असताना आपला बळीराजा मात्र मदतीविना संकटात आहे. त्याची दिवाळी या सरकारने अंधारातच ठेवली. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, संत्र्याचे प्रचंड नुकसान झाले. बोंडअळीने कपाशी संपविली. मराठवाडा, विदर्भ आणि इतरही सर्व भागात हीच अवस्था! पण मदत द्यायला सरकार तयार नाही.” असेही फडणवीस म्हणाले.
