…तर शेतकर्यांची दिवाळी अंधारात जाईल!
देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र..
मुंबई, दि. ५ नोव्हेंबर:
राज्यात अतिवृष्टी तसेच बोंडअळीच्या रोगामुळे कापूस, सोयाबीनचे नुकसान झाले आहे. शेतमाल खरेदी विलंब यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. राज्य सरकारने शेतकर्यांना तातडीने मदत द्यावी अन्यथा त्यांची दिवाळी अंधारात जाईल, असे फडणवीस यांनी म्हटले.
फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. या पत्रात ते म्हणतात की, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात जो शासन आदेश काढण्यात आला, त्यात विविध निकष ठेवल्याने विदर्भातील बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. दुसरीकडे शेतमालाची खरेदी अजून प्रारंभ झालेली नाही. ओलसर कापसाला खाजगी व्यापारी भाव देत नाही, त्यामुळे शेतकर्याची पिळवणूक होते आहे. सोयाबीन सुद्धा ओला असल्याने ३ हजार रूपयांपेक्षा कमीच भाव मिळत आहे. राज्य सरकारने तातडीने विदर्भातील प्रशासनाला निर्देश देऊन, दिवाळी ७ दिवसांवर आली असताना तातडीने मदत वितरित करावी. ही कारवाई त्वरेने पूर्ण न केल्यास विदर्भातील शेतकर्यांची दिवाळी अंधारात जाईल.
विदर्भात कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनचेही प्रचंड नुकसान झाले आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात ही स्थिती आहे. इतकी गंभीर स्थिती असताना कुठेही सरकारच्या वतीने प्रशासनाला कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत. असेही फडणवीस म्हणाले.
