कोरोनाचा फटका शेतकऱ्यांना; कांदा, बटाट्याचे भाव घसरले.
कोरोनाचा फटका शेतकऱ्यांना; कांदा, बटाट्याचे भाव घसरले.
मुंबई, दि. २१ जून २०२०
कोरोनाच्या संकटाने सर्वांनाच फटका बसला असून आता शेतकऱ्याच्या मालही कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. वाशीच्या कृषी उत्पन्न बाजारात कांदा ३ रुपये तर बटाटा ४ रुपये किलो भावाने विकला गेला. मुंबईतील छोटे मोठे हॉटेल्स, वडापाव, भजी विकणारे स्टॉल बंद असल्याने ग्राहक कमी झाले आहेत तर दुसरीकडे कोरोनाच्या कडक नियव व अटीमुळे माल घेऊन येणाऱ्या वाहनांच्या संख्येवरही निर्बध आलेत.
वाशीच्या एपएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्यांना अनेक तपासण्याचे दिव्य पार पाडावे लागत आहे. शेतमालाच्या फक्त १०० वाहनांनाच प्रवेश दिला जात आहे तर ग्राहकांच्या वाहनांना प्रवेश दिला जात नाही. माथाडी कामगारही मोठ्या संख्येने गावी गेलेत. त्यामुळे वाशीच्या मार्केटमध्ये मालाला उठावही नाही.
कांद्याची मोठी बाजार पेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारपेठेत कांद्याला सरासरी ७५० रुपये भाव मिळत आहे. कोरोनामुळे हॉटेल व्यवसायच बंद असल्याने कांदा बटाट्याची मागणीही कमी झाली आहे. कांद्याला प्रति क्विंटल सरासरी ९०० खर्च येत असून सध्याच्या बाजारभावात शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघत नाही.
