IMG_20201010_194131

वाशिम, दि. १०  ऑक्टोबर :

कोरोनावर मात करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जावून याबाबत माहिती देण्यात येत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून आपल्या जीवनशैलीत बदल करणे आता आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

वाशिम येथील जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (आरटी-पीसीआर) ई-लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोना संसर्गाला सुरुवात झाली तेव्हा राज्यात केवळ एक-दोनच विषाणू चाचणी प्रयोगशाळा होत्या. आता राज्यात प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारणी करण्यात येत आहे. त्यानुसार वाशिम येथे विषाणू चाचणी प्रयोगशाळा उभारणीची मागणी आज पूर्ण झाली. या प्रयोगशाळेचा पूर्ण क्षमतेने उपयोग करून चाचण्यांची संख्या वाढवावी. कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी चाचणीची सुविधा, उपचार केंद्रांची संख्या वाढविली आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जावून लोकांची आरोग्य तपासणी करतो आहोत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा आलेख कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

कोरोना बाधितांसाठी मोठ्या प्रमाणात बेड्स उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, त्याचा वापर करण्याची वेळ येवू नये, अशी परिस्थिती निर्माण करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा दिवसरात्र मेहनत करीत आहे, याचा सार्थ अभिमान आहे. नागरिकांनी सुद्धा कोरोनाला दूर ठेवण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. आपल्या जीवनशैलीत काही प्रमाणात बदल केल्यास कोरोनाला रोखणे सहज शक्य असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *