मंत्र्यांच्या कबुलीने मतचोरीवर शिक्कामोर्तब..
मंत्र्यांच्या कबुलीने मतचोरीवर शिक्कामोर्तब..
बुलढाणा, दि. २९ नोव्हेंबर २०२५:
नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी पक्षाचे मंत्रीच ‘कोणाचेही पैसे घ्या, पण मतं मात्र आम्हालाच द्या’, असे जाहीरपणे सांगतात हा लोकशाहीचे धिंडवडे काढण्याचा प्रकार आहे. भाजपा महायुतीचे काम ‘पैसा फेक तमाशा देख’ असा असून मंत्रीच जाहीरपणे कबुली देतात याचा अर्थ काँग्रेस व राहुल गांधी यांनी उघड केलेल्या मतचोरीवर शिक्कामोर्तबच आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांनी या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी केलेली आहे त्याचा आदर ठेवून काँग्रेस व महाविकास आघाडीतील पक्ष निवडणुका लढवत आहेत. काही ठिकाणी आघाडी झालेली आहे, तर काही ठिकाणी स्वबळावर लढाई होत आहे. शरद पवार व उद्धव ठाकरे यांना याची कल्पना दिलेली होती, यामुळे आघाडीत कोणी नाराज असण्याचा प्रश्नच नाही. जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही, त्यावर नंतर निर्णय घेतला जाईल.
महायुती सत्तेसाठी लाचार….
महायुतीतील अंतर्गत वादावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महायुतीतील ट्रिपल इंजिन सरकार हे सत्तेशिवाय राहु शकत नाही, भाजपा, शिंदेसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेसाठी लाचार आहेत, त्यामुळे महायुतीत कितीही धुसफूस असली तरी सत्तेसाठी ते जुळवून घेतील असे सपकाळ म्हणाले..
