डॉ. सुखदेव थोरातांना ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार.
डॉ. सुखदेव थोरातांना ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार.
पुणे, दि.२८ नोव्हेंबर:-
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ विचारवंत, अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांना समता भूमी फुले वाडा, पुणे येथे माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. यावेळी सन्मान पत्राचे वाचन डॉ. शेफाली भुजबळ यांनी केले.
पुरस्काराला उत्तर देतांना ज्येष्ठ विचारवंत डॉ.सुखदेव थोरात म्हणाले की, क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी जातिव्यवस्था अस्पृश्यतेचे विश्लेषण करून थांबले नाहीत; तर त्यांनी शूद्र, अस्पृश्य आणि स्त्रिया यांच्या न्याय आणि उन्नतीसाठी प्रत्यक्ष कार्य केले. जातिभेद निर्मूलन , खालच्या जातीतल्या व्यक्ती आणि स्त्रियांना शिक्षण, सामाजिक राजकीय हक्क, एकेश्वरवाद, तर्कनिष्ठता या सर्व गोष्टींसाठी त्यांनी लढा दिला.
महात्मा फुले यांनी शुद्र, दलित, स्त्रिया शेतकरी यांच्या प्रश्नांच्या स्वरूपाचे अध्ययन केले. त्याची जातिव्यवस्थेमध्ये असलेली कारणे शोधली.व त्यावर उपाय सुचविले व त्यांच्यामध्ये परिवर्तन आणण्याकरिता सामाजिक चळवळ उभी केली. त्याकरिता संस्था उभा केल्या व आपल्या हयातीत बदल घडवून आणले. त्यांच्या या कार्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी खंबीरपणे त्यांना साथ दिली असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महात्मा फुले यांनी आपल्या संशोधनातून शुद्र, अतिशूद्र, दलित, स्त्रिया, शेतकरी व कामगार यांच्या प्रश्नांची उकल केली. महात्मा फुले यांनी शोधून काढले की शूद्र आणि अतिशुद्रांचे शोषण जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेमुळे होते, कारण शूद्र आणि अतिशुद्रांना सर्व आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक अधिकारांपासून वंचित ठेवले गेले होते.त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन करून समानता, विज्ञानवाद आणि न्याय यांचा पुरस्कार केला.
महात्मा फुलेंच्या सामाजिक चळवळीने अनेक समाजसुधारक निर्माण केलेत. त्याला सामाजिक व राजकीय चळवळीना प्रोत्साहन दिले. ही परंपरा शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महात्मा फुले समता परिषदेच्या कार्याचा गौरव करत सन २०१० च्या सुमारास नागपूर येथील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते “Dalits in India: In Search of a Common Destiny” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असल्याच्या आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर,प्रा.लक्ष्मण हाके, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष बापू भुजबळ, सत्संग मुंडे, डॉ.स्नेहा सोनकाटे, डॉ. शेफाली भुजबळ, विशाखा भुजबळ,डॉ. सुदर्शन घेरडे, यश बोरावके, मंजिरी धाडगे, प्रीतेश गवळी, पंढरीनाथ बनकर, महिला वैष्णवी सातव यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातील समता सैनिक उपस्थितीत होते.
