images (3)

उद्धव ठाकरे ‘डबल ढोलकी’ !

यवतमाळ, दि. २७ ऑक्टोबर :
विरोधकांनी यवतमाळमध्ये केलेल्या ‘ढोलकी बजा’ आंदोलनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार पलटवार केला.

तो नेता डबल ढोलकी आहे. एका बाजूने काँग्रेसची, दुसऱ्या बाजूने हिंदुत्वाची ढोलकी वाजवतो, पण दोन्ही बाजूंनी आवाज निघत नाही,” अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. ‘कालीराम का फट गया ढोल, हो गया उसका डब्बा गोल’ या गाण्याचा उल्लेख करत, “मतदार त्यांचा डब्बा गोल केल्याशिवाय राहणार नाही,” असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरही त्यांनी चिमटा काढत म्हटले, “दिवाळीला काही जणांची ‘मनोमिलनाची नाटके’ झाली, पण लोक त्यांचं दिवाळं काढतील.” मतदार सुज्ञ आहे आणि सत्तेसाठी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणाऱ्यांना धडा शिकवेल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

‘घरात बसून फेका मारणारा मुख्यमंत्री लोकांना नको’

रस्त्यावर उतरून काम करणारी संघटना म्हणजे शिवसेना. लोकांना रस्त्यावर काम करणारा शिवसैनिकच आवडतो. घरात बसून फेक्या (थापा) मारणारा मुख्यमंत्री लोकांना आवडला नाही,” असा प्रहारही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला.

शिंदे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा आशीर्वाद आपल्यावर आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा वारसा आपल्याकडे आहे.” त्यांनी यवतमाळमध्ये जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून राबवलेल्या जलयुक्त शिवार आणि इतर योजनांचा उल्लेख करत विकासकामांचा आढावा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *