OBC च्या मुळावर उठणा-यांना आडवे करा…
OBC च्या मुळावर उठणा-यांना आडवे करा…
बीड , दि.१९ ऑक्टोबर:-
आपलं आरक्षण आज धोक्यात आले आहे.मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी नोंदीमध्ये खाडाखोड केली जात आहे. त्यातून खोटे दाखले दिले जात आहे. हे कदापीही सहन करणार नाही. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ओबीसींच्या प्रश्नावर आपण न्यायालयीन लढाई व रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. पण त्या सोबतच राजकीय लढाई देखील आपल्याला लढाई लढायची आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ओरीजनल ओबीसी बांधवांना निवडून द्या आणि ओबीसींच्या मुळावर जे उठले असतील त्यांना आडवे करा, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
ओबीसी व भटके विमुक्त आरक्षण बचावासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्या वतीने बीड येथे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाएल्गार सभा बीड येथील छत्रपती संभाजी मैदानावर पार पडला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे,ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार मनोज कायंदे,माजी खासदार समीर भुजबळ,आमदार पंकज भुजबळ, प्रा . लक्ष्मण हाके,प्रा.लक्ष्मण गायकवाड, मुस्लीम ओबीसी संघटनेचे नेते शब्बीर अन्सारी,माजी आमदार तोताराम कायंदे,आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील,संजय दौंड,सयाजी झुंजार,प्रा.सत्संग मुंडे, ईश्वर बाळबुधे, नवनाथ वाघमारे, बापू भुजबळ, प्रा.दिवाकर गमे, प्रा.मनोहर धोंडे, प्रा.पी टी चव्हाण,दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक,मनोज घोडके, राजेंद्र महाडोळे, डॉ.सुदर्शन घेरडे, यांच्यासह ओबीसी व भटके विमुक्त समाजांचे नेते,समता परिषदेचे समता सैनिक व राज्यभरातून आलेले सकल ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी लोकशाहीर सचिन माळी व शीतल साठे यांनी आरक्षण व महापुरुषांच्या विविध गीतांचे सादरीकरण केले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, दिवाळी तोंडावर आहे मात्र आपल आरक्षण आज धोक्यात आले आहे. आपण दिवाळी कशी साजरी करणार आहोत. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे यासाठी आपला नेहमीच पाठींबा राहिला. त्यासाठी नेहमीच आपण उभे राहिलो आहे. मात्र ज्यांचा कुठलाही अभ्यास नाही असे लोक ओबीसी समाजातून आरक्षण द्या अशी मागणी करत असल्याची टीका त्यांनी केली. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. जो समाज आजही मुख्य प्रवाहात नाही त्यांना समाजाची मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण हे अतिशय महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, ओबीसींची जात निहाय जनगणना करण्यासाठी आपली अनेक वर्षापासूनची मागणी आहे. स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबतीने माजी खासदार समीर भुजबळ यांनी ओबीसी खासदारांचे संघटन करून मागणी केली होती. अनेक दिवसांच्या आपल्या या लढ्याला यश मिळाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. ही जात निहाय जनगणना दशवार्षिक जनगणने सोबतच व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली.
ते म्हणाले की, आजवर झालेल्या अनेक समित्यांनी मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या दुर्बल नाही असे स्पष्ट केले आहे. तसेच अनेक न्यायमूर्तींनी यावर निकाल दिला आहे. मराठा आणि कुणबी या दोन वेगवेगळ्या जाही असल्याचे म्हटले आहे. तसेच मराठा समाज हा सामाजिक मागासलेला नाही त्यामुळे त्यांना आरक्षण देता येणार नाही असे सुप्रीम कोर्टाने देखील म्हटले आहे. तरी देखील काही तासातच चुकीचा निर्णय घेतला गेला. शासन निर्णयातील पात्र हा शब्द काढण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री हे नागपुरात होते. मात्र इकडे निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा काही लोकांचा विरोध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कॉंग्रेस नेते वड्डेटीवार मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या असे म्हणत होते, वेगवेगळ्या भूमिका जर घेतल्या तर ओबीसींचा प्रश्न अधिक वाढत जाईल. जर तुम्ही एकच निर्णय घेऊन लढणार असाल तर आम्ही आपल्या पाठीशी राहू मात्र राजकारण आणू नये असा टोला त्यांनी लगावला.
गावागावातील ओबीसी बांधवाना मारहाण होत आहे. त्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. दरवेळी आम्हाला सूचना करण्याची गरज पडायला नको. ज्या गोर गरीब समाजावर दहशत माजविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. अन्यथा या अन्यायाच्या विरोधात समाज तीव्र लढा उभारेल असा इशारा त्यांनी दिला. तसेच जे लोक समाजासमाजात भांडणे लावण्याचे काम केले जात आहे. त्यांच्या पाठीशी मराठा समाज नाही. काही मुठभर लोकांना घेऊन हे लोक काम करता आहे. त्यांना चांगला धडा शिकवा असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, गोपीनाथराव मुंडे यांनी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी सर्व पक्षभेद विसरून लढा दिला होता. त्यांचे वारस धनंजय मुंडे यांनी त्यांचे हे काम पुढे न्यावे असे आवाहन त्यांनी केले.
