Ads

-

वाळू घाटांचे लिलाव पंधरा दिवसांत!

By Xtralarge News

October 14, 2025 9:58 pm

Ads

वाळू घाटांचे लिलाव पंधरा दिवसांत!

मुंबई, दि. १४ ऑक्टोबर:

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर वाळूची आवश्यकता भासणार असून, त्यामुळे वाळू घाटांचे लिलाव वेळेत करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या कामात दिरंगाई करण्यावर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

वाळू धोरण आणि वाळू गटाबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. अपर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित होते. तर, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज, सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

बावनकुळे म्हणाले, “राज्यात कोणत्याही परिस्थितीत वाळू टंचाई निर्माण होऊ नये. वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया तातडीने पूर्ण करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा. वाळूचा अवैध उपसा व वाहतूक थांबवण्यासाठी कठोर कारवाई करावी. वाळू माफियांवर कारवाई होईलचा पण, वाळू चोरी झाल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल.

पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळालेल्या वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचेही निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले. पर्यावरण परवानगी प्रक्रिया सुलभ होण्यासाठी महसूल आणि पर्यावरण विभागाने समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यातील वाळू साठ्यांची तपासणी करून माहिती अद्ययावत करण्याचेही निर्देशही यावेळी देण्यात आले.

No comments to show.

Leave a Comment