20201001_091046

मानवतेची सेवा करणाऱ्या कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय..

मुंबई दि. 1 ऑक्टोबर  :

शासकीय रूग्णालयातील डॉक्टर, अधीक्षक, प्राध्यापक, प्रमुख व्यवस्थापिका (मेटरन), स्वच्छता निरीक्षक आणि सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी कोरोना महामारीच्या संकट काळात निष्ठेने सेवा करीत आहेत. या सर्व कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

कोविड १९ या जागतिक महामारीच्या काळात मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालय, द कामा ॲण्ड ॲलब्लेस रूग्णालय, गोकुलदास तेजपाल (जीटी) रूग्णालय आणि जे.जे. रूग्णालयातील कोविड वॉरियर्सचा राजभवन येथे त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अभिनंदनपर भाषणात राज्यपाल कोश्यारी बोलत होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, माता-पिता-गुरू आणि देव यांचे आयुष्यातील स्थान महत्त्वाचे आहे. यामध्ये आपण देवाला पाहिले नाही परंतु, जेव्हा प्रकृती खराब होते, तेव्हा आपल्याला डॉक्टरच आठवतात आणि हेच आपल्यासाठी देव आहेत. कोरोनाच्या रूग्णांना अतिशय प्रेमाने आणि माणुसकीने शासकीय रुग्णालयात उपचार देण्यात येत आहेत. राजभवन येथील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले होते, मात्र आज सर्व ठणठणीत आहेत. अशाचप्रकारे आर्थिकदृष्ट्या गरीब रूग्णही पूर्णत: स्वस्थ होणे गरजेचे आहे आणि तेच आपले कर्तव्य असून, पुढेही आपल्याकडून असेच कार्य सुरू रहावे. या कालावधीत कार्यरत असणाऱ्या ज्या  वैद्यकिय कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले त्यांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कुटुंबियांना सुदृढ आरोग्य लाभावे, ही भावनाही राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमात राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोनामुक्त झालेल्या अनेकांनी अनुभव कथन केले. जे.जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित मानकेश्वर, राज्याच्या कोवीड लॅबरॉटरीचे नियंत्रक डॉ. सचिन मुलकुटकर आदींसह ३३ कोविड वॉरियर्सना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *