‘जायकवाडी’तून विसर्ग; 10 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविले.

0
20250928_200001

‘जायकवाडी’तून विसर्ग; 10 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविले.

मुंबई,  दि. २९ सप्टेंबर २५ ;
जायकवाडी विसर्गामुळे जालना जिल्ह्यात सुमारे 10,000 लोकांना विविध गावांतून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, यातील 6870 नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाजमंदिरात केलेल्या व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. परतूर, अंबड, घनसावंगी येथील हे नागरिक आहेत. त्यांना भोजन आणि सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. 23 ठिकाणी अशा निवासव्यवस्था करण्यात आल्या आहेत. अनेक शेतकर्‍यांच्या पशुधनालाही सुरक्षित स्थळी हलवून त्यांना चारा देण्यात येत आहे.

मराठवाड्यातील पूरस्थिती आणि राज्यातील विविध धरणांचा विसर्ग याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. जायकवाडी धरणातून 1,88,000 क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. सुदैवाने पाऊस बंद झाल्याने आता विसर्ग वाढविण्याची गरज नाही. सर्व संबंधित जिल्हाधिकार्‍यांना यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. येलदरी धरणातून 29,400 क्युसेक इतका विसर्ग होतो आहे आणि तो पूर्णपणे नियंत्रणात आहे. मांजरा आणि तेरणा नद्यांचा पूर आता ओसरला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती नियंत्रणात आहे. उजनीतून 75,000 इतका विसर्ग होत असून, सीना कोळेगावमधून 80,000 क्युसेक इतका विसर्ग होतो आहे. गंगापूर धरणातून 11,000 क्युसेक इतका विसर्ग होत असून, मुळा धरणातून 10,000 क्युसेक विसर्ग सुरु आहे. पाऊस आता कमी झाला आहे. जायकवाडी धरणातून नाशिक, नगर भागातील धरणातून विसर्ग 87,000 वरुन 68,000 क्युसेकवर नियंत्रित केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणातून 54,500 क्युसेक इतका विसर्ग सुरु असून, हतनूर धरणातून 65,800 क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. कोकणातील सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *