ठाकरेंचे दोन माजी नगरसेवक भाजपमध्ये ..
ठाकरेंचे दोन माजी नगरसेवक भाजपमध्ये ..
मुंबई, दि. २३ जून ;
शिवसेना UBT गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी त्यांना प्रवेश देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार प्रविण दरेकर, मुंबई भाजपा उपाध्यक्ष कमलाकर दळवी उपस्थितीत होते.
यावेळी मंत्री शेलार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकरूप होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करत शिवसेना UBT गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. याचा अर्थ त्यांनी उबाठाचे नेतृत्व नाकारले आहे. हा या नाटकाचा पहिला अंक आहे लवकरच दुसरा आणि तिसरा व शेवटचा अंक तुम्हाला पहायला मिळेल.
UBT गटाची अवस्था धोकादायक आणि जिर्ण झाली आहे. त्यांनी मुंबई, मुंबईकर, हिंदुत्व, हिंदु सण उत्सव यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यामुळे ते धोकादायक स्थितीत आहेत, तर त्यांना सोडून ज्या पद्धतीने पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार जात आहेत त्यावर तो पक्ष जिर्ण अवस्थेत आहे. 2017 च्या निवडणूकीत त्यावेळच्या शिवसेनेपेक्षा भाजपाला फक्त दोन जागा कमी होत्या आता भाजपामध्ये चार माजी नगरसेवकांंनी प्रवेश केल्यानंतर भाजपा नंबर 1 चा पक्ष झाला.
मुळ शिवसेनेतील 50 हून अधिक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले त्यामुळे ठाकरे सेना हा पक्ष अत्यंत जिर्ण अवस्थेत आहे, अशी टीका शेलार यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुंबईला 5 लाख कोटींचा निधी दिला आम्ही मुंबईकरांची सेवा करीत असून देव, देश आणि धर्मासाठी आमची लढाई सुरु आहे, असेही ते म्हणाले.
