50 खोक्यांची विकृती लोकशाहीला अत्यंत घातक.
मुंबई, दि. १७ जून ..
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने मागील १२ वर्षांत देशाची लोकशाही व संविधानाची हत्या करण्याचे पातक वारंवार केले आहे. विरोधी पक्षच ठेवायचा नाही ही मानसिकता भाजपामध्ये वाढीस लागली आहे आणि याच मानसिकतेतून पक्ष फोडले जात आहेत. शिवसेना (UBT) पक्षाचे ६ खासदार गद्दारी करत सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला गेले आहेत. या सहा खासदारांनी जनमताचाच अनादर केला नाही तर आघाडी धर्माचा, लोकशाही आणि जनतेचा घोर अपमान केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रीया मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
यासंदर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मोदी सरकार विरोधक संपवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर करत आहे. भाजपाने दुसऱ्या पक्षातून आमदार व खासदार विकत घेण्याचा अत्यंत अघोरी प्रकार सुरु केला आहे आणि हा त्यांचा धंदा बनला आहे. मागील वेळी ‘५० खोके, एकदम ओके’ हा प्रकार उघड झाला होता. आता या ६ जणांची बोली किती कोटींना लागली हेही लवकरच बाहेर येईल. सत्तेसाठी हे सहाजण लाचार झाले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडी भाजपविरोधात निकराने लढली पण आज महाविकास आघाडीतील काही लोक विकले गेले हे अत्यंत खेदाने म्हणावेसे वाटते. जनतेने भाजपविरोधात कौल दिला होता, ज्यांच्यासाठी दिवस रात्र प्रचार केला, त्यांनीच गद्दारी केली. पैशाने विकले जाणाऱ्यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटायला हवी, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
Leave a Comment