शिक्षण ‘व्यवस्था’ नसून ‘लूट’ करणारी व्यवस्था..
कोटा, राजस्थान, दि. १८ जून २६.
भारतातील शिक्षण व्यवस्थेचे वास्तव अत्यंत भिषण आहे. ही व्यवस्था विद्यार्थी व पालकांचे शोषण करणारी आहे. विविध परिक्षेसाठी भरावे लागणारे शुल्क व इतर खर्च यातून पालकांचा खिसा रिकामा केला जातो. देशातील प्रमुख पाच परीक्षांवर (SSC, UPSC, JEE, RRB, NEET) ३.५ लाख कोटी रुपये खर्च करतात.हे वसुली तंत्र आता बंद केले पाहिजे असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राजस्थानातील कोटा येथे राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण व्यवस्थेतील फोलपण पुराव्यासह उघड करुन दाखवला. राहुल गांधी पुढे म्हणाले की, NEET परीक्षेला बसणाऱ्या २२ लाख विद्यार्थ्यांच्या कुटुंबांकडून दरवर्षी १.३२ लाख कोटी रुपये खर्च केले जातात. दुसरीकडे, सरकार देशाच्या शिक्षण बजेटसाठी जवळपास तितकीच रक्कम, म्हणजेच १.४ लाख कोटी रुपयांची तरतूद करते. थोडक्यात सांगायचे तर, केवळ एका परीक्षेवर २२ लाख लोक तितकाच पैसा खर्च करतात, जितकी रक्कम भारत सरकार आपल्या संपूर्ण शिक्षण बजेटसाठी राखून ठेवते.
देशातील शिक्षण व्यवस्थेचे वास्तव समजून घ्या असे सांगत राहुल गांधी म्हणाले की, जर १,००० मुले या व्यवस्थेत आली, तर त्यापैकी केवळ १२ जणांनाच पगाराची नोकरी मिळेल. सुमारे ३०० मुले बेरोजगार राहतील; त्यांच्यापैकी अनेकजण अंमली पदार्थांच्या आहारी जाण्याची आणि कर्जाच्या विळख्यात अडकण्याची शक्यता आहे. सुमारे ७०० मुले ‘गिग वर्कर्स’ (अस्थायी/कंत्राटी कामगार) किंवा हमाल म्हणून काम करतील, मनरेगा (MGNREGA) सारख्या योजनांमध्ये सहभागी होतील किंवा असंघटित क्षेत्रात काम करतील. थोडक्यात सांगायचे तर देशातील तरुणांची उघडपणे फसवणूक केली जात आहे; कारण ही केवळ शिक्षण व्यवस्था नसून ती एक प्रकारची लूट करणारी व्यवस्था आहे.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान, मी अशा लाखो तरुणांना भेटलो ज्यांना डॉक्टर, इंजिनिअर, वकील, आयएएस अधिकारी किंवा सशस्त्र दलात सामील व्हायचे आहे. यामुळे मला प्रश्न पडला: आपल्या देशाची शिक्षण व्यवस्था या तरुणांना फक्त पाचच पर्याय का देते? मग मी या प्रवासादरम्यान काही मुलींशी बोललो आणि त्यांना मनापासून काय करायचे आहे हे विचारले; त्यांची उत्तरे त्या पाच व्यवसायांच्या पलीकडची होती. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, देशाची शिक्षण व्यवस्था मुलांची स्वप्ने पूर्ण करत नाही, ती केवळ त्यांच्यासमोर पर्याय सादर करत आहे. असे राहुल गांधी म्हणाले.
नीट पेपरफुटी प्रकरणावर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करावी अशी भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली असून देशभर आंदोलने करत मोदी सरकारला कोंडीत पडकले आहे. कोटामधील राहुल गांधी यांची सभा हा त्यापैकीच एक आहे.
Leave a Comment