20200921_225620

मुंबई, दि. 21  सप्टेंबर :

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’करिता महत्वाचे साधन ठरणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी ई–पीक पाहणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली. ठाकरे म्हणाले की, कृषी विभागाने ‘विकेल ते पिकेल’ ही योजना आणली असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ, मालाला योग्य भाव मिळवून देणे यावर भर देण्यात येत आहे. यानुसार या मोबाईल ॲपमुळे शेतकरी वर्ग संघटित होणे आवश्यक आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये केवळ शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे हे लक्ष्य नसून शेतकऱ्यांनी कोणतं पीक घेणे आवश्यक आहे, कोणते पीक कोणत्या विभागात घेतले जाणे आवश्यक आहे, कोणत्या पीकाला चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे, पिकाला योग्य भाव कसा मिळेल याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात राज्यातील पिकांचा नकाशा तयार करण्याचे उद्दिष्ट आवश्यक असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

ई- पीक पाहणी संदर्भात मोबाईल ॲप विकसित करताना यामध्ये कोणत्याही उणीवा राहू नये यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. या मोबाईल ॲपचा उपयोग शेतकऱ्यांनाच होणार असल्याने त्यांच्यासाठी हे किती महत्वाचे आहे हे त्यांना समजावून सांगणे महत्वाचे आहे.वस्तुस्थिती दर्शक, सद्यस्थिती दर्शक माहिती संकलित करण्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पध्दतीने माहिती, इमेजेस अपलोड करण्याची सोय देण्यात आली आहे ही अत्यंत चांगली बाब असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
महसूलमंत्री थोरात म्हणाले की, टाटा ट्रस्ट मार्फत शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात येणारे ई-पीक पाहणी संदर्भातील मोबाईल ॲप हे अत्यंत उत्कृष्ट ॲप असणार आहे. सध्या नऊ तालुक्यातील शेतकऱ्यांकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या नव्या ॲपमुळे शेतकऱ्यांच्या आणि तलाठी यांच्या वेळेची बचत होण्याबरोबरच शेतकऱ्यांना आपल्या पिकांची माहिती देणे अधिक सोपे होणार आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे या कामात पारदर्शकता, गतिमानता आणि अचूकता येण्यास मदत होणार आहे.एकाच वेळी 240 हून अधिक पिकांची माहिती मिळणे, पिकांची वर्गवारी करणे सोपे होणार आहे. परंतु हे करीत असताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांना या प्रक्रियेत सामावून घेणे आवश्यक आहे, असेही थोरात यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *