मुलुंडच्या छ. संभाजी मैदानाच्या दुर्दशेकडे BMC लक्ष देईल का?
मुलुंडच्या छ. संभाजी मैदानाच्या दुर्दशेकडे BMC लक्ष देईल का?
मुंबई, दि. २८ नोव्हेंबर –
मुलुंड पूर्वेला असलेल्या छत्रपती संभाजी महाराज मैदानाची दुर्दशा झाली असून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी बाहेरून माती आणून धावपट्टी तयार केल्याने मैदानाची दुर्दशा झाली आहे. शिवाय धावपट्टी बनवण्यासाठी वापरण्यात आलेले प्लास्टिक गोणी व दगड ठिकठिकाणी विखुरल्याने सायकल चालवण्यासाठी येणारे लहान मुले या दगडांमध्ये तसेच उंच करण्यात आलेल्या धावपट्टीत अडकून जखमी होतात. पालिका अधिकाऱ्यांचे याकडे सर्रास दुर्लक्ष झाले असून या मैदानाला कोणी वाली आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुलुंड पूर्वेला असलेल्या छत्रपती संभाजी महाराज मैदान हे पालिकेच्या मालकीचे असून त्याची देखरेख गार्डन विभागामार्फत करण्यात येते. मैदानाची दुर्दशा पाहता गार्डन विभाग अस्तित्वात आहे की नाही या विभागात काम करणारे अधिकारी नेमके करतात तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी अनेक ठिकाणी मैदान खोदून त्या ठिकाणी बाहेरून मोठ्या प्रमाणावर माती आणून उंच धावपट्टी तयार केली आहे. जमिनीपासून अर्धा ते एक फूट उंच धावपट्टी तयार करण्यात आल्याने या ठिकाणी मॉर्निंग वॉक तसेच सायकल चालविण्यासाठी येणा-या लहाण मुलांसाठी या धावपट्ट्या त्रासदायक ठरत आहे. मैदानाच्या चारही दिशेला वाट्टेल त्या प्रकारे धावपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. शिवाय त्यासाठी लागणारे पाणी ही मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत असल्याने या मैदानात देखरेख करणारे सेक्युरीटी गार्ड करतात तरी काय असा प्रश्न निर्माण होत आहे. गेल्या महिन्याभरापासून या धावपट्ट्या तयार करण्यात येत असून पालिकेचे टी विभाग, गार्डन विभागाचे अधिकारी नेमके काय काम करतात. असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.
रात्री अपरात्री या ठिकाणी विद्यालय तसेच महाविद्यालयातील अनेक तरुण तरुणी या ठिकाणी येऊन धुम्रपान, मद्य सेवन करीत असतात अशा लोकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक ठिकाणी तर कुत्र्यांना फिरवण्यासाठी आणले जाते. त्यांच्यामार्फत केलेली घाण देखील नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. या ठिकाणी मनमानी कारभार करणाऱ्या लोकांवर पालिका अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसून हम करे सो कायदा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
