छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा ही भाजपची पेशवाई वृत्ती:

0
20240901_155259

मुंबई, दि. १ सप्टेंबर ;
भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला गेला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, खोके सरकारने आमच्या दैवतांचा अपमान केला आहे. विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली पण हे पाप अक्षम्य आहे. या चुकीला माफी नाही. राज्यात आणि देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागायची आणि सतेत आल्यावर त्यांचा अपमान करायचा ही भाजपची पेशवाई वृत्ती आहे. असा घणाघाती प्रहार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळून महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडीने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चा काढत सरकारला जोडे मारो आंदोलन केले. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खा. छत्रपती शाहू महाराज, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, CWC सदस्य खा. चंद्रकांत हंडोरे, CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खा. संजय राऊत, खा. सुप्रिया सुळे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अनिल देशमुख, आदित्य ठाकरे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

हुतात्म्यांना अभिवादन करून हा मार्चा गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहचला, यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार म्हणाले की, मालवणच्या राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. गेट वे ऑफ इंडियासमोरचा पुतळा अनेक वर्षापासून आहे, राज्यातही अनेक भागात असे पुतळे आजही भक्कमपणे उभे आहेत. राजकोटच्या किल्यावरील पुतळा कोसळण्याची घटना हा भ्रष्टाचाराचा नमुना आहे. महाराजांचा पुतळा कोसळल्याने देशातील शिवप्रेमींचा अपमान झाला आहे, ज्यांच्यामुळे हा पुतळा पडला त्यांचा निषेध करण्यासाठी आजचे आंदोलन होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *