कमी मतदानास निवडणूक आयोगाच जबाबदार.

0
images (4)

मुंबई, दि.२२ मे;
महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादी मधून अनेकांची नावं गहाळ झाली होती तर निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारामुळे अनेक मतदारांना आपला मतदानाचा अधिकार बजावता आला नाही. निवडणूक विभागा कडून करण्यात आलेल्या चुकीमुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आसाममध्ये ७८ टक्के, बंगालमध्ये ८१ टक्के मतदान झालं. पण महाराष्ट्रात इतकं कमी मतदान करताना लोकांना काय झालंय ते लक्षातच आलेलं नाही. मतदान केंद्रांवर पाणी नव्हतं, पंखे नव्हते, काही ठिकाणी मशीन बंद पडल्या. मतदारांची गैरसोय कशी होईल हे पाहिलं गेलं. कळवा मुंब्रा येथील आमदार म्हणून मी खुली तक्रार करतो आहे की हे निवडणूक आयोगाचं सपशेल अपयश आहे. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेमुळेच हे सगळं झालं आहे. लोकांना मतदान करायचं होतं मात्र कुठे नावंच नाही, कुठे मतदान केंद्रच दूर अशा घटना घडल्या आहे. १५०० लोकांची एक यादी अशा याद्या तयार करण्यात आल्या आहेत. ५०० ते ७५० लोकांपेक्षा जास्त मतदारांची यादी नसावी. जेणेकरुन ते एका मशीनवर मतदान करु शकतात. यावेळेस निवडणूक आयोगाने काय केलं आहे माहीत नाही? समजा १५०० पैकी साठ टक्के लोक मतदानाला उतरले तर ९०० लोक झाले. १५०० लोकांसाठी एक मशीन आधी दोन मशीन दिल्या जात होत्या. यावेळी सगळीकडे एकच मशीन. त्यामुळे मतदान पूर्णच झालं नाही. मतदान करायला लोकांना चार-चार तास लागत होते ही वस्तुस्थिती आहे.

आमच्याकडे १२ लोक रांगेतच बेशुद्ध पडले. हॉस्पिटलला न्या, उपचार करा हे सगळं फक्त मी कळवा, मुंब्रा या ठिकाणांबद्दलच बोलतो आहे. हे प्रकार राज्यात सगळीकडे झाले. मला आधी सांगा १५०० लोकांची यादी करणारा मागे नेमका कोण आहे? हे निवडणूक आयोगाने तपासलं पाहिजे. आणखी एक प्रकार घडलाय तो म्हणजे समजा एक इमारत आहे आणि तिथे एका कुटुंबात पाचजण असतील तर पाचही जणांचं मतदान वेगवेगळ्या केंद्रांवर. याचा अर्थ काहीही लक्ष देण्यात आलेलं नाही. एकाच कुटुंबातले लोक आहेत. तर त्यांचं नाव वेगवेगळ्या शाळांमध्ये कसं? हेदेखील सगळीकडे झालं. ईव्हीएम मशीन मंदावल्या कशा हे तर न उलगडणारं कोडं आहे. या मशीन जाणीवपूर्वक मंद केल्या गेल्या होत्या असं आमचं मत आहे,असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *