मुंबईला महाराष्ट्रापासून कुणाचा बाप तोडू शकत नाही..
मुंबई दि १३ मे ;
मुंबईवर २५ वर्षे राज्य करणाऱ्यांनी मुंबईकरांना, मराठी माणसाला काय दिले? निवडणुका आल्या की, मुंबईला महाराष्ट्रातून तोडण्याचे षडयंत्र सुरू झाले आहे असे यांचे पोपट बोलू लागतात. मुंबईला महाराष्ट्रापासून कुणाचा बाप ही तोडू शकत नाही. मराठी माणूस बेघर झाला त्याचं आधी उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावं असा सवाल करत मराठी माणसाच्या नावावर मतं मागून त्यालाच नागवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केल्याची घणाघाती टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सभेची गर्दी पाहता या मतदार संघाचा निर्णय झाला आहे. ही देशाची निवडणूक आहे. देशाला सुरक्षित करू शकेल असा नेता निवडायचा आहे. महाभारताच्या लढाईत एकीकडे पांडव आणि दुसरीकडे कौरव होते तशीच स्थिती आज आहे. आमचा महायुतीचा नेता ठरला आहे. इंडी आघाडीला तुमचे प्रधानमंत्री कोण आहेत ते सांगा असे विचारले मात्र, ते सांगू शकले नाही. सकाळी नऊ वाजता पोपटलाल टीव्हीवर येऊन पाच वर्षात पाच प्रधानमंत्री करू असे म्हणतात. हे संगीत खुर्चीचा खेळ सुरू करणार आहेत. हा देश आहे, तुमची खाजगी मालमत्ता नाही, घंटा खुर्ची नाही. देशाला सुरक्षित ठेवू शकतो असा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे. ज्यांना नेता नाही,निती नाही, ज्यांची नियत नाही असे सर्वजण एकत्रित आले आहेत. ते देशाला दिशा देवू शकत नाहीत. या देशाला समोर नेऊ शकत असेल त्या व्यक्तीचे नाव नरेंद्र मोदी आहे. मिहिर कोटेचा यांना दिलेले मत मोदींना जातं. इतर कुणाला मत दिलं तर ते राहुल गांधीला जातं. महायुती म्हणजे विकासाची ट्रेन आहे. याला मोदींचे मजबूत इंजिन आहे. वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत. या डब्यात समाजातील सर्व घटकांना बसायला जागा आहे. सबका साथ सबका विकास म्हणून विकासाची ट्रेन पुढे जात आहे. दुसरीकडे डबेच उरले नाहीत. मनसेचं इंजिन आपल्या सोबत आहे. राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, स्टॅलिन, ममता दीदी सर्वजण मी इंजिन आहे असं म्हणतात. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त प्रियांका आणि सोनिया गांधी यांना जागा आहे. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे यांना तर शरद पवार यांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळे यांना जागा आहे, तुमच्याकरता जागा नाही. तुमच्याकरता जागा फक्त मोदींच्या गाडीमध्ये आहे. तुम्ही कमळाचे बटन दाबताच ईशान्य मुंबईची बोगी मिहिर कोटेचा मोदींच्या इंजिनला लावतील. मग आपल्याला कोणी थांबवू शकणार नाही. मोदींनी दहा वर्षात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. २० कोटी लोकांना झोपडीतून पक्क्या घरामध्ये आणले आहे. ५० कोटी लोकांच्या घरी गॅस दिला. ५५ कोटी लोकांना शौचालय दिले. ६० कोटी लोकांच्या घरी नळाने पाणी दिले. ८० कोटी लोकांच्या घरी २०२० पासून राशन देत आहेत. पुढचे पाच वर्षे देणार आहेत. महाराष्ट्रातील सात कोटी लोकांना मोदी राशन देत आहेत. ६४ कोटी लोकांना मुद्रा लोन देण्यात आले. तरुणांना पायावर उभे केले. व्यवसायासाठी तरुणांना दहा लाखापर्यंतचे लोन विनातारण दिले. यामध्ये ५० टक्के महिलांना लोन देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. ८० लाख बचत गट तयार केले. १० कोटी महिलांना मोदींनी काम दिले. त्यांना लखपती करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. २०२६ नंतर लोकसभेत आणि विधानसभेत ३३ टक्के महिला जाणार आहेत. समाजातील सर्व घटकात मोदींनी परिवर्तन केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोविडकाळात लोक मरत असताना यांनी घोटाळे केले. कोविडमध्ये आपल्याच देशामध्ये लस तयार करण्याचे काम मोदींच्या नेतृत्वात झाले. १४० कोटी भारतीयांना दोन वेळ मोफत लस दिली. त्यामुळे आज तुम्ही आम्ही सुखरुप आहोत. कफन, खिचडी चोर कोणत्या तोंडाने बोलत आहेत. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या या लोकांनी कफनमध्ये, ऑक्सिजनमधे भ्रष्टाचार केला. जवळच्या लोकांना कंत्राट दिली गेली. ज्यांनी मुंबईकरांना फसवल, नागवलं त्यांना मुंबईकरांनी जाब विचारायला हवा.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईत ३३६ किमी मेट्रो जाळे तयार होत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या जीवनात परिवर्तन होईल. मुंबईतील रस्ते काँक्रीटचे होत आहेत. दरवर्षी रस्ते बनवून गरिबांचा पैसा लुटण्याचे काम झाले. उद्धव ठाकरेंनी तयार केलेला एक आयकॉनिक प्रकल्प उद्धव ठाकरेंनी दाखवावा. आमच्या सरकारने एसटीपी प्रकल्प सुरू केले. येणाऱ्या काळात दूषित पाण्याचा एक थेंब समुद्रात जाणार नाही असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, निवडणुका आल्या की, भावनिक बोलायचं आणि गेल्या की विसरून जायचं. जागं होण्याची गरज आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले की, काँगेससोबत जाण्याची वेळ येईल त्या दिवशी मी माझे दुकान बंद करीन… त्यांच्याच सुपुत्राने काँग्रेसशी युती करून आता उद्धव ठाकरे पंज्याला मत देणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर गेला. उद्धव ठाकरेंचे सरकार आल्यावर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर केला. महायुती सरकार आल्यावर आम्ही पहिल्या क्रमांकावर आलो. उद्योग आणण्यासाठी ताकद, धमक लागते आम्ही ते करून दाखवलं. यांनी सचिन वाझेच्या माध्यमातून वसुली केली. आपण मोदींच्या काळात बदललेला भारत पाहतोय. काँगेसच्या काळात देशात बॉम्बस्फोट व्हायचे. मोदी आल्यावर थेट पाकिस्तानात घुसून सर्जिकल, एअर स्ट्राइक केला. त्यानंतर भारताकडे बघण्याची पाकिस्तानची हिम्मत झाली नाही. हा लढणारा नवीन भारत आहे असेही ते म्हणाले.
