Ads

--

मोदीजी, हा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ!

By Xtralarge News

April 30, 2024 8:21 pm

Ads

पुणे, दि. ३० एप्रिल:

माझा आत्मा अस्वस्थ आहे पण स्वतःसाठी नाही तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी माझा आत्मा अस्वस्थ आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थ होईन असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी नरेंद्र मोदींवर केला.

शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हल्ली माझ्यावर फार राग दाखवत आहेत. मोदी यांनी एकेकाळी भाषण केले होते की, मी शरद पवार यांच्या बोटाला धरुन राजकारणात आलो. मात्र, आता तेच मोदी बोलत आहेत की, महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे, तो अस्वस्थ आहे. हे खरं आहे माझा आत्मा अस्वस्थ आहे परंतु तो स्वत:च्या स्वार्थासाठी नाही तर जनता भोगत असलेल्या दु:खासाठी अस्वस्थ आहे.

देशातील शेतकऱ्यांची दु:ख पाहून आत्मा अस्वस्थ होत असेल, तर त्यामध्ये काही चुकीचे वाटत नाही. सध्या संपूर्ण देशातील लोक महागाईने त्रस्त आहेत. त्यांना दररोजचा संसार चालवणे अवघड झाले आहे. या गोष्टीसाठी मी १०० वेळा अस्वस्थ होईन असेही शरद पवार यांनी सांगितले.

सर्वसामान्य माणसांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्राधान्याने काम केले पाहिजे, हे यशवंतराव चव्हाण यांनी आमच्यावर केलेले संस्कार आहेत. या संस्कारांशी मी कधीच कोणतीही तडजोड करणार नाही. मी तडफड करत आहे. होय, मी देशातील लोकांचं दु:ख पाहून खूप तडफडतो. त्यासाठी मला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण मी लाचार होणार नाही. महाराष्ट्र देखील दिल्लीपुढे लाचार होणार नाही.

भारतीय जनता पक्षाने आमचं घर फोडलं, माझा पक्ष फोडला आणि अनेक वर्षे काम करण्याची संधी दिलेल्या लोकांनासुद्धा फोडले. हे फोडाफोडीचे राजकारण राज्याच्या दृष्टिकोनातून अजिबात हिताचे नाही. खरं तर जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, येथे मात्र अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला जात आहे.

पंतप्रधान मोदी रविवारी पुण्यात म्हणाले की, मी ईडीचा एक टक्काही वापर करत नाही. परंतु, जनतेने ज्यांच्यावर विश्वास टाकला आहे, त्यांना तुम्ही तुरुंगात टाकता. आता तुम्ही एक टक्का म्हणा नाही तर आणखी काय म्हणा. तुम्ही मात्र हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करताय असेही शरद पवार म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment