मुंबई, दि. २१ एप्रिल;
केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबई मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पियुष गोयल यांनी कोळी व आगरी समाजाचा अपमान केल्याबदद्ल मुंबई काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले. कांदीवलीत आंदोलन सुरु असताना भाजपाच्या गुडांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर विशेषतः महिलांवर भ्याड हल्ला केला. यात कार्यकर्त्यांच्या वाहनांचे नुकसानही झाले. लोकशाहीत आंदोलन करण्याचा संविधानाने अधिकार दिला आहे परंतु संविधान व लोकशाही न माननाऱ्या भाजपाने हा हल्ला करुन आपली लायकी दाखवली आहे. भाजपाच्या अशा दादागिरीला काँग्रेस भिक घालत नाही, पियुष गोयल यांनी कोळी व आगरी समाजाचा अपमान केल्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केली आहे.
पियुष गोयल यांनी बाभई व वझिरा गावठाणात प्रचार करताना मासळीचा वास सहन होत नसल्याने नाकाला रुमाल लावला होता. या भागात कोळी व आगरी भूमिपुत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नाकाला रुमाल लावून पियुष गोयल यांनी कोळी व आगरी समाजाचा अपमान केल्याबद्दल गोयल यांच्याविरोधात तीव्र नाराजी आहे. पियुष गोयल यांच्या विरोधात मुंबई काँग्रेसच्या वतीने धारावी, वर्सोवा, मालाड, कुलाबा, माहूल गाव, चेंबूर, बोरीवली, माहीम, अंधेरी, गोराई, कांदिवली येथे आंदोलने करून गोयल यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पियुष गोयल होश में आवो, भूमिपुत्र विरुद्ध भाजपा, मुंबई आगरी, कोळ्यांची, नाही कुणाच्या बापाची, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
कांदिवली येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करत असलेल्या आंदोलनावरील केलेल्या भाजपा हल्ल्याचा तीव्र निषेध करत प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याची हिमत करणाऱ्या भाजपाच्या गुंडांवर कडक कारवाई झाली पाहिजे. कोळी व आगरी समाजाचा अपमान काँग्रेस सहन करणार नाही. पियुष गोयल यांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांना समज द्यावी. पुन्हा अशी आगळीक केली तर काँग्रेस कार्यकर्तेही जशास तसे उत्तर देतील. आजच्या प्रकरणावरून एक स्पष्ट झाले आहे की देशभरात भाजपा पराभूत होत असून भाजपा सरकार शेवटचे दिवस मोजत आहे. उत्तर मुंबईसह मुंबईतील सहाही जागांवर भाजपा महायुतीचा पराभव केल्याशिवाय मुंबईकर गप्प बसणार नाही.
Leave a Comment